ताज्या पुस्तकातून ‘अंत:स्थ’ बाबींवर प्रकाश

काँग्रेसमध्ये कोणतेही पद नसतानाही सोनिया गांधी यांचा काँग्रेसमध्ये दबदबा होता आणि त्याचा अदृश्य  ताण तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या मनावर होता. त्यातूनच त्यांनी काहीवेळा सोनिया गांधी यांच्या हालचालींवर तसेच त्यांना समर्थन देणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर नजर ठेवण्याची कामगिरी गुप्तचर विभागावर (आयबी) सोपविल्याची बाब एका पुस्तकाने उघडकीस आली आहे.

‘हाफ-लायन : हाऊ पी. व्ही. नरसिंह राव ट्रान्स्फॉर्मड इंडिया’ या पुस्तकात हा भाग उघड झाला असून हे पुस्तक २७ जूनपासून उपलब्ध होणार आहे. हा तपशील राव यांच्या खासगी कागदपत्रांमधून आणि १०० हून अधिक संबंधितांच्या मुलाखतींमधून उघड झाला आहे.

राजीव गांधी यांची १९९१मध्ये हत्या झाली. त्यानंतर काँग्रेसजनांनी आग्रह करूनही सोनिया गांधी काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्या नाहीत. राव पंतप्रधानपदी नियुक्त झाले. त्यानंतरही काँग्रेसमधील अनेक नेते सोनिया यांच्या संपर्कात होते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील चर्चाही त्यांच्यापर्यंत पोहोचत होती. बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर तर राव आणि सोनिया यांच्यातील संबंध अतिशय ताणले गेले.

बाबरी पाडली गेल्यानंतर ७ डिसेंबर १९९२ रोजीच राव यांनी आयबीच्या अधिकाऱ्याला १० जनपथ येथे नियुक्त केले होते, कोणते काँग्रेसजन आपल्या विरोधात आहेत याची चाचपणी करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. आयबीने बंगल्यातील संभाषणही नमूद केले होते. सोनिया यांच्यासमवेत अर्जुनसिंह, दिग्विजय सिंह, अजित जोगी, सलामतुल्लाह आणि अहमद पटेल यांची चर्चा झाली. पंतप्रधानांनी बाबरी प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले त्याबद्दल या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. उभय नेत्यांमधील ताणले गेलेले संबंध आणि सोनियांचा वाढता प्रभाव या पाश्र्वभूमीवर मे १९९५ मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी इच्छुक असलेले किती जण आपले आणि किती जण १०, जनपथचे समर्थक आहेत, हे शोधण्याची कामगिरी राव यांनी आयबीवर सोपविली होती.

आयबीने नावांच्या यादीसह उत्तर दिले होते. नावांच्या यादीपुढील स्तंभात आयबीने संबंधित व्यक्ती कोणत्या राज्यातील आहे, त्यांचे जात, वय, निष्ठा आणि राजकीय प्रभाव असा तपशील होता. उदाहरणार्थ एम. एस. अय्यर यांच्या नावापुढे तामिळनाडू, ब्राह्मण, ५२, १० जनपथ समर्थक असे लिहिले होते. पंतप्रधानांनी अयोध्या प्रश्न ज्या पद्धतीने हाताळला होता त्यावर अय्यर यांनी टीका केली होती. यादीचा शेवट संघटनात्मक पदांसाठी उपयुक्त नेत्यांच्या नावांनी करण्यात आला होता. त्यामध्ये अग्रभागी शरद पवार, मराठा, संशयित, कुशल संघटक आणि प्रभावशाली नेता, उपयुक्त सिद्ध होऊ शकतो, असे लिहिले होते. सोनिया यांच्यावर वचक ठेवण्यासाठी पंतप्रधान सत्तेचा वापर करीत होते, तर पंतप्रधानांवर वचक ठेवण्यासाठी सोनिया पक्षाचा वापर करीत होत्या, हे या पुस्तकातून उघड होत आहे.