ब्राह्मोस क्षेपणास्त्राची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याप्रकरणी अटकेत असलेला ब्राह्मोस एअरोस्पेस प्रा. लि.चा कर्मचारी निशांत अग्रवाल हा हनीट्रॅपमध्ये अडकल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानातील महिलांच्या बनावट फेसबुक प्रोफाईलशी चॅटिंगद्वारे त्याने ही माहिती लीक केल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक आणि उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथक यांनी संयुक्त कारवाई करीत निशांत अग्रवालला ताब्यात घेतले आहे. त्याने शासकीय गोपनियता कायद्याचे उल्लंघन केल्याचे या पथकांचे म्हणणे आहे. निशांत अग्रवाल हा नागपूरच्या उज्वलनगरचा रहिवासी आहे. तो इंजिनिअर असून ब्राह्मोस एअरोस्पेस प्रा. लि.मध्ये वैज्ञानिक म्हणून कामाला आहे.

तपास पथकाच्या माहितीनुसार, पाकिस्तानातून महिलांच्या बनावट फेसबुक अकाऊंटद्वारे भारतातील राष्ट्रीय सुरक्षा विषयक संवेदनशील संस्थांमध्ये काम करणाऱ्या लोकांना फसवण्याची कार्यपद्धती समोर आल्यानंतर युपी एटीएसकडून अशा घडामोडींवर बारीक नजर ठेवण्यात येत होती. यापूर्वी अशा प्रकरणात अटकेची कारवाई झालेल्या बीएसएफ जवानाच्या चौकशीदरम्यान आणखी दोन संशयास्पद बनावट फेसबुक अकाऊंट समोर आले होते. हे बनावट अकाऊंट महिलांच्या नावे बनवण्यात आले असून ते पाकिस्तानातून चालवण्यात येत होते. या फेसबुक अकाऊंटशी नागपूरमधील एका संरक्षण संस्थेत काम करणारा इंजिनिअर निशांत अग्रवाल चॅटिंग करीत असल्याचे स्पष्ट झाले.

निशांत अग्रवाल या हनीट्रॅपमध्ये अडकल्याचे स्पष्ट झाल्यानंतर युपी एटीएसने कोर्टाकडून सर्च वॉरंट मिळवत सोमवारी (दि.८) महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने संशयीत निशांत अग्रवाल याच्या घरावर सकाळी छापा टाकला. या छाप्यामध्ये तपास पथकांना निशांतच्या कॉम्प्युटरमध्ये गोपनीय तसेच अतिसंवेदनशील माहिती मिळाली. ही संवेदनशील माहिती निशांतच्या वैयक्तिक लॅपटॉपवर आढळून आल्याने हा प्रकार शासकीय गोपनियता कायद्यानुसार गुन्हा मानला गेला आहे. एटीएसकडून निशांतच्या कार्यालयाचीही तपासणी करण्यात आली. तसेच त्याच्या रुकडी येथील घरातूनही जुना लॅपटॉप मिळवण्यात आला असून त्याचीही तपासणी केली जात आहे.

तपास पथकांनी सांगितले की, या अटकेच्या कारवाईनंतर निशांतला नागपूरमध्ये सत्र न्यायालयासमोर हजर केले जाणार असून त्याच्या ट्रान्जिट रिमांडची मागणी केली जाणार आहे. त्यानंतर त्याला लखनऊमध्ये आणले जाईल. सध्या निशांतवर गोपनिय माहिती स्वतःजवळ बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. यानंतर त्याने पाकिस्तानला ही माहिती पुरवली आहे का? हे तपासले जात असून ते सिद्ध झाल्यानंतर त्याच्यावरील गुन्हेगारी कलमे वाढवण्यात येतील. या प्रकरणी इतरही अनेक ठिकाणांची चौकशी केली जात आहे. याचप्रकारे कानपूर आणि आग्रा येथे देखील प्रत्येकी एका व्यक्तीची चौकशी करण्यात आली. त्यांचे लॅपटॉपही ताब्यात घेण्यात आले आहेत. चौकशीनंतर त्यांचाही यातील सहभाग स्पष्ट होऊ शकतो. त्यानुसार त्यांच्यावरही योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने युपी एटीएसचे पोलीस उपाधीक्षक मनिष चंद्र सोनकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात येत आहे.