गोंधळप्रकरणी काँग्रेसच्या ५५ आमदारांचे निलंबन
गुजरातमधील पटेल आरक्षण आंदोलनाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करून मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्यावर ‘लॉलीपॉप’ फेकल्याबद्दल गुजरात विधानसभेत उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या ५५ आमदारांना हे अधिवेशन संपुष्टात येईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.
सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच घोषणाबाजीच्या तयारीत असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी डोक्यावर पांढऱ्या रंगाच्या टोप्या घातल्या. त्यावर जय सरदार, जय पाटीदार असे लिहिलेले होते.हार्दिक ने जेल, अनार ने महल, अशा घोषणा लिहिलेले फलकही आमदारांनी फडकाविले.सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने विधानसभा अध्यक्ष गणपत वसावा यांनी स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र काँग्रेसच्या आमदारांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर काँग्रेसच्या आमदारांनी सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांच्या दिशेने लॉलीपॉप फेकले त्यापैकी काही लॉलीपॉप आनंदीबेन पटेल आणि अन्य ज्येष्ठ मंत्र्यांच्या आसनाजवळ पडले. आरोग्यमंत्री नितीन पटेल यांनी काँग्रेसच्या आमदारांची नावे घेऊन त्यांना दोन दिवसांसाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला.