केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यानिमित्तानं वर्षभराच्या काळात सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाचा प्रसार सरकार व भाजपाकडून केला जात आहेत. मोदी सरकारला वर्षपूर्तीबरोबरच केंद्रातील सत्तेची सूत्र हातात घेण्याला सहा पूर्ण झाली आहे. यानिमित्तानं काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांना मोदी सरकारला पाच प्रश्न विचारले आहेत.

२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन करणाऱ्या भाजपानं २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीतही यांची पुनरावृत्ती केली. २३ मे २०१९ रोजी लोकसभेचे निकाल लागले आणि देशातील सत्ता पुन्हा भाजपाकडं गेली. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतली. याला एक वर्ष पूर्ण झालं असून, भाजपाकडून वर्षभराच्या काळात करण्यात आलेल्या कामांची माहिती दिली जात आहे.

आणखी वाचा- … हे लवकर विसरता येणार नाही; मायावती यांचा नरेंद्र मोदींना चिंतन करण्याचा सल्ला

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिलं वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी ट्विट करून प्रश्न उपस्थित केले आहेत. “भाजपा सरकारला सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. भाजपानं ६ स्मार्ट शहरांची नावं सांगावीत. मेक इन इंडियाच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या ६ कंपन्यांची नावं सांगावीत. दत्तक घेतलेल्या ६ गावांची नावं, जिथे आता काम सुरू आहे. १५ लाख रुपये मिळालेल्या ६ लोकांची नावं सरकारनं सांगावीत. त्याचबरोबर २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा थेट लाभ झालेल्या ६ लोकांची नावंही द्यावी,” असे पाच प्रश्न पटेल यांनी सरकारला विचारले आहेत.

मायावतींनीही केली टीका

पटेल यांच्या बरोबरच बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनीही मोदी सरकारच्या कामावर असमाधान व्यक्त केलं आहे. “देशातील जवळपास १३० कोटी संख्येमध्ये गरीब, बेरोजगार, शेतकरी, स्थलांतरित मजूर व महिला यांचं जीवन आज पूर्वीपेक्षा अधिक त्रासदायक झालं आहे. जे की अतिशय दुःखद आहे. हे लवकर विसरता येणार नाही. अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं आपली धोरण आणि काम करण्याच्या पद्धतीची समीक्षा करायला हवी. ज्या ठिकाणी उणीवा दिसून येतात, त्यावर पडदा टाकण्याऐवजी त्या दूर करायला हव्यात. देशाहितासाठी बीएसपी भाजपाला हाच सल्ला आहे,” असं मायावती यांनी म्हटलं आहे.