पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांना आज राजकोट स्टेडियममध्ये घुसण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हार्दिक पटेल यांनी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना उधळून लावण्याची धमकी दिली होती.
पटेल आरक्षणाच्या मुद्यासह भारत-दक्षिण आफ्रिका संघाच्या क्रिकेट सामन्याची तिकिटे भाजपाच्याच कार्यकर्त्यांना दिल्याच्या निषेधार्थ पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी राजकोट येथे होणारा क्रिकेट सामना उधळवून लावण्याचा तसेच दोन्ही संघाच्या खेळाडूंना स्टेडियममध्ये जाण्यापासून रोखण्याचा इशारा दिला होता. यापार्श्वभूमीवर पोलिसांनी स्टेडियम परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. दरम्यान, हार्दिक आपल्या कायकर्त्यांसह स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी आज हार्दिक पटेल यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून दिवसभरासाठी राजकोटमधील इंटरनेट सेवा बंद ठेवली आहे.