चीनला धोबीपछाड देत भारत जगाच्या आर्थिक विकासाचे नवे केंद्र म्हणून नावारुपास येत आहे, असा हॉर्वर्ड विद्यापीठाने अहवालात म्हटले आहे. हॉर्वर्ड विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विकास केंद्राने, ‘२०२५ पर्यंत भारत ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल’, असे म्हटले आहे. २०२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था वर्षाला सरासरी ७.७ टक्के वेगाने वाढेल, असे हॉर्वर्ड विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विकास केंद्राने अहवालात म्हटले आहे.

‘जागतिक आर्थिक विकासाचे केंद्र गेल्या काही वर्षांपासून चीनकडून भारताकडे सरकते आहे. पुढील जवळपास दशकभर भारतच जागतिक आर्थिक विकासाचे केंद्र म्हणून कायम राहू शकते,’ असे हॉर्वर्ड विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विकास केंद्राने अहवालात नमूद केले आहे. अनेक क्षेत्रांमध्ये असलेली विविधता आणि क्षमतांचा पुरेपूर वापर यामुळे भारताची आर्थिक घोडदौड जोमाने होईल, असा अंदाज हॉर्वर्ड विद्यापीठाने व्यक्त केला आहे. रसायने, वाहन निर्मिती आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनात भारत अग्रेसर असेल, असेदेखील हॉर्वर्ड विद्यापीठाचा अहवाल सांगतो.

‘इंधनावर आधारित मोठ्या अर्थव्यवस्थांची पडझड होते आहे. कारण या अर्थव्यवस्था एकाच संसाधनावर अवलंबून आहेत. भारत, इंडोनेशिया आणि व्हिएतनामने विविधतेसाठी आपल्या नव्या क्षमतांचा विकास केला आहे. या देशांमध्ये अनेक प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती होत असल्याने या देशांचा विकास वेगाने होण्याची शक्यता आहे,’ असे हॉर्वर्ड विद्यापीठाने अहवालात म्हटले आहे. भारत, तुर्कस्तान, इंडोनेशिया, युगांडा आणि बल्गेरियासारख्या देशांचा आर्थिक विकास वेगाने होऊ शकतो, असेदेखील हॉर्वर्ड विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विकास केंद्राने अहवालात नमूद केले आहे.

हॉर्वर्ड विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विकास केंद्राच्या अहवालात तीन गटांमध्ये देशांची विभागणी करण्यात आली आहे. यामधील पहिल्या गटातील देश थोड्या सुधारणांसह आपल्या उत्पादनांमध्ये विविधता आणू शकतात. तर दुसऱ्या गटात, आपल्या विकासासाठी पुरेशा क्षमता असलेल्या देशांचा समावेश आहे. या गटात भारत, इंडोनेशिया आणि तुर्कस्तानचा समावेश होता. तिसऱ्या गटात जपान, जर्मनी, अमेरिकेसारख्या विकसित देशांचा समावेश आहे. जवळपास सर्वच उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या देशांचा या गटात समावेश करण्यात आला आहे. या देशांची अर्थव्यवस्था संथ गतीने वाढेल, असे हॉर्वर्ड विद्यापीठाने म्हटले आहे.