सरकारी जाहिरातीमुळे वाद

स्वातंत्र्यानंतर गेल्या सात दशकांत महिला सबलीकरणासाठी संपूर्ण देशभरातील राज्यांनी आपापल्या धोरणांमधून शिक्षण आणि प्रगतीची दारे उघडून पुरोगामी विचारांची कास धरली असली, तरी भाजपशासित हरयाणामधील विचारांचा प्रवाह प्रतिगामी बनत चालल्याचे उदाहरण एका जाहिरातीतून समोर आले आहे. हरयाणा सरकारतर्फे प्रसिद्ध होणाऱ्या एका मासिकातील छायाचित्रावर घुंघट ही राज्याची ओळख असल्याचे छापून वर त्याचे समर्थन तेथील मंत्र्यांनी केल्यामुळे नवा वाद उफाळून आला आहे. हरयाणामधील महिला सर्वच क्षेत्रात पुरुषांशी बरोबरी करीत आहेत. तीनच दिवसांपूर्वी याच राज्यातील तरुणीला ‘मिस इंडिया’चा खिताब मिळाला. क्रीडा आणि सर्वच क्षेत्रात राज्यातील महिला आणि मुली आघाडीवर आहेत. असे असताना महिलांचा घुंघट ही राज्याची ओळख असल्याचे सांगणारे हे छायाचित्र भाजपची मागास विचारसरणीच दर्शवत असल्याचे, माजी मुख्यमंत्री  भुपिंदरसिंग  हुडा यांनी स्पष्ट केले.  घुंघट संस्कृती ही हरयाणात अस्तित्वात नव्हती. परकीय आक्रमणे झाली तेव्हा त्यांच्या भयाने महिला घुंघट घेऊ लागल्याचे त्यांनी नमूद केले. भाजप सरकार पुढारलेल्या विचारांऐवजी राज्याला काळाच्या मागे नेत असल्याची टीका त्यांनी केली.

हरियाणातील महिला या पुढारलेल्या असून भाजप ‘बेटी बचाओ’, ‘बेटी पढाओ’ या उपक्रम राबवण्याऐवजी ‘बेटी छुपाओ’ हा नवा कार्यक्रम राबवू पाहत आहे का, असा सवाल काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला.

दरम्यान, अनिल वीज आणि रामविलास शर्मा या भाजप मंत्र्यांनी विरोधकांची टीका थोपवून लावली आहे. भाजपने महिला सबलीकरणासाठी मोठी पावले उचलली असून महिलांनी घुंघटमध्येच राहावे असा दबाव कधीच आणलेला नाही, असे वीज यांनी स्पष्ट केले. घुंघटमध्ये राहावे की नाही, ही त्यांची इच्छा आहे, असेही त्यांनी नमूद केले. रामविलास शर्मा यांनी विरोधकांकडे काही नाही, म्हणून ते हा मुद्दा उकरून काढत असल्याचे म्हटले.

झाले काय?

येथील शासनाच्या ‘हरयाणा संवाद’ नावाच्या मासिकात ‘कृषी संवाद’ ही पुरवणी दिली जाते. त्याच्या मुखपृष्ठावर ‘घुंघट की आन-बान म्हारा हरियाणा की पेहचान’ असे ठळक वाक्य असलेली जाहिरात आहे. या मासिकाच्या मुखपृष्ठावर येथील मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे छायाचित्र आहे.  घुंघटाच्या जाहिरातीवरून टीकायुद्धच सुरू झाले आहे.