देशात होणाऱ्या आगामी सार्वत्रिक निवडणुका आणि सुप्रीम कोर्टात होणार असलेली सुनावणी या पार्श्वभूमीवर आता राम मंदिराचा मुद्दा हळूहळू तापायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, भाजपा नेते आणि हरयाणा सरकारमधील मंत्री अनिल विज यांनी अयोध्या प्रकरणावरील सुप्रीम कोर्टाच्या कामकाजावर वादग्रस्त टिपण्णी केली आहे. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


माध्यमांशी बोलताना विज म्हणाले, ‘सुप्रीम कोर्ट महान आहे, ते त्यांच्या मर्जीप्रमाणे काम करीत आहेत. याकुब मेमनसाठी कोर्ट रात्री १२ वाजण्याच्या सुमारास चालू असते. मात्र, राम मंदिराच्या खटल्याच्या सुनावणीसाठी लोक अतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, त्यासाठी तारखेवर तारीख काढली जात आहे.’ सुप्रीम कोर्टाने सोमवारी राम मंदिर खटल्याची सुनावणी तातडीने घेण्यास नकार देत. पुढील वर्षी जानेवारी महिन्यापासून सुनावणी सुरु होईल असे म्हटले आहे. कोर्टाच्या या आदेशावर विज यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राम मंदिर हा सध्या देशातील सर्वात संवेदनशील आणि ज्वलंत मुद्दा बनला आहे. वर्षानुवर्षे निवडणुकांच्या काळात मंदिर उभारण्याबाबतच्या घोषणा केल्या जातात आणि मतांसाठी त्याचा राजकीय नेतेमंडळी फायदा करुन घेतात. भाजपानेही सत्तेत आल्यापासून राम मंदिर उभारण्याची अनेक आश्वासने जनतेला दिली. मात्र, मंदिर उभारण्याबाबत हालचाल नसल्याने भाजपाचा हा जुमला असल्याची टीका हिंदूत्ववादी संघटनांकडून केला जात आहे.

दरम्यान, भाजपामधील काही मंत्र्यांकडून आणि इतर राजकीय पक्षांकडून राम मंदिर उभारण्याबाबत कायदा करण्याची तसेच अध्यादेश आणण्याची मागणी केली जात आहे. तर हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने सरकारला यात हस्तक्षेप करता येणार नाही असे काही विरोधी संघटनांचे मत आहे.