सामूहिक बलात्काराच्या घटनांनी हरयाणा हादरले असतानाच हरयाणातील अतिरिक्त पोलीस महासंचालक आर. सी. मिश्रा यांनी वादग्रस्त विधान करुन पीडित कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. ‘बलात्कार हा समाजाचा एक भाग असून अनंतकाळापासून अशा घटना होत आल्या आहेत’ असे विधान त्यांनी केले आहे.

हरयाणातील बलात्काराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस महासंचालक आर.सी.मिश्रा यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मिश्रा यांच्याकडे अंबाला रेंजचा कार्यभार आहे. राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न विचारताच मिश्रा म्हणाले, बलात्कारासारख्या घटना अनंतकाळापासून घडत आल्या आहेत. पोलिसांचे काम आहे तपास करणे, गुन्हेगारांना पकडणे आणि गुन्हे सिद्ध करणे. मिश्रा यांच्या विधानावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. बलात्कारासारख्या घटना घडत असताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानेच असे विधान करणे अयोग्य आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले.

दरम्यान, बुधवारी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी महिला सुरक्षेबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. दोषींवर कठोर कारवाईसाठी पोलीस प्रशासनात बदल करण्यात आले आहेत. अशा घटना रोखण्यासाठी कठोर कारवाईचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, मिश्रा यांच्या विधानानंतर पोलीस प्रशासन बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी खरंच गंभीर आहे का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.हरयाणातील बलात्काराच्या घटनांचे पडसाद दिल्लीतही उमटू लागले आहेत. बुधवारी संध्याकाळी आंदोलकांनी खट्टर यांचा पुतळा जाळत निषेध केला.

जिंदमधील १५ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. गेल्या आठवड्यात पानिपतमध्येही ११ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. तर रविवारी संध्याकाळी फरिदाबादमध्ये २२ वर्षांच्या तरुणीवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. या तिन्ही घटनांमुळे पोलिसांवर चोहोबाजूंनी टीका होत आहे.