उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरण देशातील महत्त्वाचा मुद्दा बनला असून, योगी सरकारच्या कारवाईकडे देशाचं लक्ष लागलं होतं. अखेर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारनं कारवाई करत पोलीस अधीक्षक, व इतर अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. योगी सरकारच्या या कारवाईवर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी सवाल उपस्थित करत राजीनाम्याची मागणी केली आहे.

हाथरसमध्ये १९ वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचे देशभरात संतप्त पडसाद उमटले. विरोधकांनी योगी सरकारला घेरलं, तर आंदोलन करत लोक घटनेबद्दल आपला संताप व्यक्त करत आहे. घटनेवरून तीव्र पडसाद उमटत असतानाच योगी सरकारनं हाथरस प्रकरणात मोठी कारवाई करत या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबन केलं आहे.

योगी सरकारनं निलंबनाची कारवाई केल्यानंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना सवाल केला आहे. “योगी आदित्यनाथजी काही जणांना निलंबित करून काय होणार आहे? हाथरस पीडिता व तिच्या कुटुंबीयांना जो भयंकर त्रास देण्यात आला, तो कुणाच्या आदेशावर देण्यात आला? हाथरसचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांचे फोन रेकॉर्डस सार्वजनिक करण्यात यावेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या जबाबदारीपासून दूर पळण्याचा प्रयत्न करू नये, देश पाहतोय, योगी आदित्यनाथजी राजीनामा द्या,” अशी मागणी प्रियंका गांधी यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमुळे चर्चेत असलेल्या उत्तर प्रदेशात हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेनं खळबळ उडवून दिली आहे. संपूर्ण देशाचं लक्ष सध्या हाथरसमधील घटनाघडामोडींकडं लागलं आहे. या घटनेमुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला विरोधकांनी घेरलं असून, सोशल मीडियातूनही संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.