तुमच्या विचारांशी एखादी व्यक्ती असहमत असेल किंवा मतभिन्नता असेल तर त्या व्यक्तीचा तुम्ही किती द्वेष करता त्यावर तुमचे देशप्रेम ठरवले जाते. हे योग्य नाही असे मत गीतकार, लेखर आणि माजी खासदार जावेद अख्तर यांनी व्यक्त केले. ते साहित्य आजतक कार्यक्रमात बोलत होते. तुम्ही तुमच्या पालकांवर प्रेम करता तसेच देशावर प्रेम करणे ही नैसर्गिक भावना आहे.

देशप्रेम नैसर्गिक भावना आहे. मी अजून इशान्यभारतात गेलेलो नाही पण मेरी कोम जेव्हा जिंकते तेव्हा मला अभिमान वाटतो. मी माझ्या कुटुंबावर, मित्र परिवारावर प्रेम करतो पण त्याचा अर्थ मी दुसऱ्यांचा तिरस्कार करावा असा होत नाही असे अख्तर म्हणाले. राष्ट्रवादाच्या संकल्पनेबद्दलही जावेद अख्तर यांनी आपला दृष्टीकोन सांगितला.

राष्ट्रवाद तुम्हाला कोणाचा तिरस्कार करायला लावत असेल तर तो धोकादायक आहे पण तोच राष्ट्रवाद देशप्रेमाशी संबंधित असेल तर त्यात काहीही चुकीचे नाही असे अख्तर म्हणाले. भारत नावाची ही नौका अधूनमधून हेलकावे खाते पण ती कधी बुडणार नाही. हा देश कधी असंतुलित होणार नाही असे जावेद अख्तर म्हणाले.

एखादा राजकीय किंवा धार्मिक विषयावर मत व्यक्त केल्यानंतर आपल्याबद्दल उमटणाऱ्या प्रतिक्रियांनी फार फरक पडत नाही असे त्यांनी सांगतिले. तुम्हाला काहीवेळेला लोक देशद्रोही ठरवतात त्या प्रश्नावर अख्तर म्हणाले कि, माझा माझ्या राष्ट्रभक्तीवर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे कोण काय बोलतो याचा मी विचार करत नाही.

हिंदू आणि मुस्लिम दोघांमध्ये सांप्रदायिकता आहे. तुम्ही पाहिले तर सांप्रदायिक मुस्लिमांना सेक्युलर हिंदू आवडत नाहीत आणि सांप्रदायिक हिंदुंना सेक्युलर मुस्लिम मान्य नसतात. दोन्ही बाजूंचे सांप्रदायिक लोक जेव्हा तुमचा विरोध करतात याचाच अर्थ तुम्ही काहीतरी योग्य करत आहात असे जावेद अख्तर म्हणाले.