मद्रास उच्च न्यायालयाला कधी नव्हे इतक्या नाचक्कीचा सामना करावा लागत आहे. उच्च न्यायालयाने आपल्याच माजी निवृत्त न्यायाधीशांविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. निवृत्त न्यायाधीश टी. मतिवानन यांच्याविरोधात हे आदेश देण्यात आले आहेत.

जस्टिस टी. मतिवानन मे २०१७ मध्ये निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनंतर ज्या खटल्यांची ते सुनावणी करत होते अशा १०० खटल्यांशी निगडीत फाइल गहाळ झाल्या आहेत. बरमुडा ट्रँगलवरुन विमान गायब व्हावेत त्याप्रमाणे या फाइल गायब झाल्यात अशी टिप्पणी या प्रकरणाची सुनावणी करणारे न्या. जी जयचंद्रन यांनी केली. यापूर्वी फाइल गहाळ प्रकरणी जस्टिस इंदिरा बॅनर्जी यांनी अंतर्गत चौकशीचे आदेश दिले होते पण हे न्यायालय आता सीबीआय चौकशीचे आदेश देत आहे, असं न्या. जी जयचंद्रन यांनी सुनावणीवेळी स्पष्ट केलं.

काय म्हणाले न्या. जी. जयचंद्रन –
ज्या खटल्यांच्या फाइल गायब झाल्या आहेत, त्यापैकी बहुतांश खटल्यात माजी न्यायाधीशांनी निर्णय सुरक्षित ठेवला होता अथवा खुल्या कोर्टात निकाल सुनावला होता. या आदेशांच्या प्रत अद्याप सापडलेल्या नाहीत. ही गंभीर आणि चिंतेची बाब आहे. पण गहाळ झालेल्या सर्व फाइलींचं बंडल निवृत्त न्यायाधीशांच्या घरून कोर्टात पुन्हा आलंच नाही हे दुर्लक्षित करुनही चालणार नाही. त्या केवळ खटल्यांशी निगडीत फाइल नव्हत्या तर न्यायालयाचे मह्त्वपूर्ण कागदपत्रंही होते. या प्रकरणात योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश सीबीआयच्या जॉइंट डायरेक्टरांना देण्यात येत आहेत.