हिंदू मुलीशी लग्न करण्यासाठी छत्तीसगढमध्ये एका ३३ वर्षीय मुस्लिम मुलाने हिंदू धर्म स्विकारला होता. पण आता आपल्या प्रेयसीला तिच्या घरच्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी त्याला सुप्रीम कोर्टामध्ये जावे लागले आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि डी वाई चंद्रचूड न्यायाधीश यांच्या खंडपीठाने छत्तीसगढ सरकारकडून याचा खुलासा मागवला आहे. तसेच छत्तीसगढमधील धमतरी जिल्हा पोलीस अधीक्षकांना २७ ऑगस्ट रोजी अशोक जैन यांची मुलगी अंजली जैनला सुप्रीम कोर्टामध्ये हजर करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची प्रत पोलिस अधीक्षकांना देण्यात आली आहे.

३३ वर्षीय मोहम्मद इब्राहिम सिद्दीकीने २३ वर्षीय प्रेयसी अंजली जैनशी लग्न करण्यासाठी हिंदू धर्म स्वीकारला होता. मोहम्मदने हिंदू धर्म स्विकारल्यानंतर आपले नामकरण आर्यन आर्य असे केले. आर्यन आर्य आणि अंजली जैन यांनी २५ फेब्रुवारी २०१८रोजी एका आर्य मंदिरामध्ये लग्न केले होते.

छत्तीसगढ उच्च न्यायालयामध्ये त्याने प्रथम याबाबत दाद मागितली होती. पण कोर्टाने अंजीलीच्या घरच्यांच्या बाजूने निर्णय दिला होता. आर्यनने त्यावेळी या निर्णयाला आव्हान करत सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पत्नीच्या जीवाला धोका असल्याचा युक्तीवाद अर्यनने मांडला आहे. अंजलीचे आई-वडिल तिचे स्वांतत्र्य हिरावून घेत आहे. घरच्यांच्याविरोधात जाऊन लग्न केल्यामुळे अंजलीवर राग काढत असल्याचा आरोपही त्याने केला आहे. त्याचप्रमाणे काही सजामजकंठकापासून आणि अंजलीच्या घरच्यांकडून आपल्यालाही धमक्या येत असल्याचा आरोप आर्यनने केला आहे. मी माझ्या मर्जीने लग्न केले आहे. २३ वर्षाची असून बालिक आहे. माझे निर्णय मी स्वत: घेऊ शकते असे अंजलीलने छत्तीसगढ कोर्टामध्ये सांगितले होते.