‘थलैवा’ रजनीकांत यांनी २०१७ च्या अखेरच्या दिवशी चाहत्यांना संबोधित करत आपला राजकारणातील प्रवेश निश्चित केला. त्यांनी ही घोषणा करताच माध्यमांपासून ते कलाविश्वापर्यंत सर्वत्र एकच उत्साहाची लाट पाहायला मिळाली. सोशल मीडियावरही रजनीकांत यांच्या नव्या इनिंगच्याच चर्चांनी जोर धरला. पण, या सर्व वातावरणात भाजपाच्या सुब्रमण्यम स्वामी यांनी मात्र ही फक्त माध्यमांनी दिलेली हवा असल्याचे वक्तव्य करत रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशावर टीका केली.

रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाविषयी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना स्वामी यांनी आपले मत मांडले. ‘त्यांनी फक्त राजकीय प्रवेशाची घोषणा केली आहे. त्याविषयी कोणतीच विस्तारित माहिती किंवा कागदपत्र सादर केले नाहीत. ते अशिक्षित आहेत. किंबहुना माध्यमांनी उगाचच हवा देऊन त्यांना मोठे केले आहे’, असे ते म्हणाले. तामिळनाडूची जनता चाणाक्ष असून, त्यांना हे सर्व लक्षात येईलच असेही त्यांनी स्पष्ट केले. राजकारणात प्रवेश करताच क्षणी रजनीकांत यांच्याविषयी अशी वक्तव्ये पाहता सध्या बऱ्याच चर्चा रंगल्याचे दिसते आहे. रजनीकांत यांची लोकप्रियता आणि जनसामान्यांवर असलेला त्यांचा प्रभाव पाहता येत्या काळात तामिळनाडूच्या राजकीय पटलावर सत्ताधाऱ्यांना तगडे आव्हान मिळणार आहे असेच म्हणावे लागेल.

वाचा : ‘थलैवा’ची राजकारणात एन्ट्री; तामिळनाडूचे राजकारण बदलण्याची गर्जना

दरम्यान, विरोधकांची ही बेसुमार वक्तव्ये दूर सारत सध्या मात्र चाहत्यांनी एकच जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. रजनीकांत यांनी ज्या अंदाजात त्यांचे ध्येय सर्वांसमोर ठेवले ते पाहता राजकीय वाटचालीमध्ये त्यांच्याकडून सर्वांनाच फार अपेक्षा असल्याचेही स्पष्ट होत आहे. ‘सध्याचे राजकारणी लोकशाहीच्या नावाखाली पैसे आणि जमिनी बळकावत आहेत. हीच परिस्थिती बदलत तामिळनाडूच्या राजकीय व्यवस्थेत आपल्याला काही महत्त्वाचे बदल घडवून आणायचे आहेत’, अशी गर्जनाही रजनीकांत यांनी केली.