भारतीय हवाई दलाच्या ४ जवानांच्या हत्येप्रकरणी जम्मू-काश्मीरमधील फुटिरतावादी नेता यासिन मलिक याच्यावर टाडा कोर्टात खटला चालवला जाणार आहे. जम्मू-काश्मीरमध्येच १ ऑक्टोबरपासून या सुनावणीला सुरुवात होणार आहे. २५ जानेवारी १९९० रोजी श्रीनगरमध्ये यासिन मलिकवर चार जवानांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा (जेकेएलएफ) नेता यासिन मलिक याच्यावर १९८९ मध्ये तत्कलीन गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबैया सईदचे अपहरण आणि १९९० मध्ये भारतीय हवाई दलाच्या चार जवानांची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनांनंतर मलिकच्या जेकेएलएफ या संघटनेवर बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत बंदी घालण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये फुटिरतावाद्यांना आणि दहशतवाद्यांना टेरर फंडिंग प्रकरणात याच वर्षी एप्रिल महिन्यांत यासिन मलिकला अटक करण्यात आली होती. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यापासून मलिक अटकेत आहे.