उत्तर भारतात उष्णतेने कहर केला असून निजामुद्दीनहून त्रिवेंद्रमला निघालेल्या केरळ एक्स्प्रेसमधील ४ प्रवाशांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आग्र्याहून निघाल्यानंतर गाडी अनेकदा थांबत-थांबत धावत असल्याने प्रचंड उष्णतेमुळे चार प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. उष्माघातामुळे धावत्या रेल्वेत प्रवाशांच्या मृत्यूच्या घटनेने खळबळ उडाली होती. दरम्यान, एक्स्प्रेस झाशी स्थानकात आल्यानंतर या चार प्रवाशांचे मृतदेह स्टेशनवर उतरवण्यात आले आणि त्यांच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली.

दहा दिवसांपूर्वी ६८ प्रवाशांचा एक गट तामिळनाडूहून वाराणसी आणि आग्र्याला पर्यटनासाठी आला होता. वाराणसीनंतर हे पर्यटक आग्र्याला पोहोचले. आग्रा फिरल्यानंतर सोमवारी दुपारी अडीज वाजता त्यांना पुन्हा पुढील प्रवासासाठी निघायचे होते. त्यामुळे या सर्व प्रवाशांनी आग्र्याहून केरळ एक्स्प्रेसमध्ये स्लीपर कोचने प्रवास सुरु केला.

दरम्यान, आग्रा ते झाशी दरम्यान एक्स्प्रेसला अनेकदा मध्येच थांबवण्यात आले यावेळी बाहेर प्रचंड उकाडा जाणवत होता. यावेळी रेल्वेतून प्रवास करणारे प्रवाशी उकाड्याने त्रस्त झाले होते. यांपैकी पाच प्रवाशांची प्रकृती अचानक बिघडली, रेल्वे मध्येच थांबवण्यात आल्याने त्यांना वेळेवर उपचारही मिळणे अवघड होऊन बसले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याचा रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप सहप्रवाशांनी केला आहे.

त्यानंतर झाशी रेल्वे स्थानकात या मृत प्रवाशांचे पार्थिव रेल्वेतून उतरवण्यात आले. तसेच आज (मंगळवारी) या हे पार्थिव त्यांच्या कुटुंबियांकडे केरळला पाठवण्यात येणार आहेत.