उत्तराखंडमध्ये वणवे पेटलेले असताना आता तेथे पाऊस पडला असून ते विझण्यास निसर्गानेही मदत केली आहे. जंगलांमध्ये लागलेल्या वणव्यात आतापर्यंत सात जण मरण पावले आहेत. सरकारने हेलिकॉप्टरमधून पाण्याचा मारा करून वणवे विझवण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले होते, पण त्यात पाऊस आल्याने यात मदतच झाली. कमी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस डोंगराळ व सखल भागात झाला असून तो रात्रभर चालू होता.
मुनसायरी येथे ११ मि.मी तर डेहराडून येथे ७ मि.मी पावसाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाचे संचालक विक्रम सिंग यांनी सांगितले. पावसाची वेगवेगळ्या ठिकाणची आकडेवारी अजून प्रसिद्ध झाली नसून काही काळात ती उपलब्ध होईल. पावसामुळे वणवे विझवण्यास मदतच झाली असून लाकडे ओली झाल्याने आता पुन्हा वणवे पेटण्याची शक्यता कमी आहे असे ते म्हणाले.
मुख्य वनसंरक्षक बी.पी.गुप्ता यांनी सांगितले की, ३४६५.९४ हेक्टर वनजमिनीवरील जंगलात वणवा पेटला होता. मतियाली या पावरी जिल्ह्य़ातील भागात धूर व इतर कारणांमुळे वणवे पाहण्यास गेलेल्या सात जणांचा मृत्यू झाला आहे.
२ फेब्रुवारीच्या वणव्यात दोन महिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर ननीताल जिल्ह्य़ातील गोलगेट भागात झारखंडमधील महिला मजूर व तिचे मूल मरण पावले. तिच्या झोपडीला वणव्याने घेरले होते.
चमोली जिल्ह्य़ात घराला लागलेली आग विझवताना २ मे रोजी एका पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला होता.