ग्रॅफाइट इलेक्ट्रोड्स तयार करणाऱ्या एचइजी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवि झुंझुनवाला हे 2018-19 या आर्थिक वर्षात सर्वाधित वेतन घेणारे व्यक्ती ठरले आहेत. या आर्थिक वर्षात त्यांनी 121.27 कोटी रूपयांचे वेतन घेतले. गेल्या आर्थिक वर्षापेक्षा त्यांचे सुरू आर्थिक वर्षातील वेतन तब्बल 180 टक्क्यांनी अधिक आहे. सर्वाधिक वेतन घेणाऱ्या व्यक्तीच्या यादीत ते आता पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत.

सुरू आर्थिक वर्षात ग्रॅफाइच्या किंमतीत रेकॉर्ड वाढ झाली होती. त्याचाच फायदा एचइजी कंपनीला झाला होता. दरम्यान, कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत घट झाली असल्याचे सांगत त्यांच्या वेतनात आणि भत्त्यांमध्ये करण्यात आलेली वाढ ही अयोग्य असल्याचे कॉर्पोरेट गव्हर्नंन्सवर देखरेख ठेवणाऱ्यांकडून सांगण्यात आले. अद्याप सर्व कंपन्यांनी आपले अॅन्युल रिपोर्ट सादर केले नाहीत. परंतु अन्य कंपन्यांची आकेडवारी आल्यानंतर झुंझुनवाला पहिल्या क्रमांकावरून घसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


गेल्या आर्थिक वर्षात टेक महिंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीपी गुरनानी 146 कोटी रूपयांच्या वेतनासह पहिल्या क्रमांकावर होते. तर सन टीव्हीचे अध्यक्ष कलानिधि मारन 87.5 कोटी रूपयांच्या वेतनासह दुसऱ्या क्रमांकावर होते. दरम्यान, झुंझुनवाला यांना मिळालेल्या वार्षिक वेतनात कंपनीला मिळालेल्या नेट प्रॉफिटच्या 2.5 टक्के कमिशनही सामिल आहे. गेल्या आर्थिक वर्षात झुंझुनवाला यांचे वेतन 43.33 कोटी रूपये तर 2017 या आर्थिक वर्षात त्यांचे वेतन 2.34 कोटी रूपये होते. सुरू आर्थिक वर्षात एचइजी कंपनीचा नेट सेल 140 टक्क्यांनी वाढून 6 हजार 593 कोटी रूपये झाला आहे. तर नेट प्रॉफिटही 175 टक्क्यांनी वाढून 3 हजार 26 कोटी रूपये झाले आहे. दरम्यान, झुंझुनवाला यांच्यानंतर हीरो मोटोकॉर्पच्या पवन मुंजाल यांचा क्रमांक आहे. त्यांनी सुरू आर्थिक वर्षात 81.41 कोटी रूपयांचे वेतन घेतले.