सर्वसामान्यांच्या खिशाला अजून झळ बसणार असून इंधन आणि कांद्याच्या दरवाढीनंतर आता सोमवारपासून (१६ डिसेंबर) दूधाच्या किंमतीही वाढणार आहेत. राज्यात गायीचे दूध सोमवारपासून (१६ डिसेंबर) लिटरमागे दोन रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना सोमवारपासून गायीच्या दुधाच्या एका लिटरसाठी ४४ ऐवजी ४६ रुपये मोजावे लागणार आहेत. तसंच, देशातील प्रसिद्ध कंपनी अमूलने आपल्या दुधाच्या दरामध्ये विविध राज्यांमध्ये शनिवारी प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ केली आहे, तर मदर डेअरीने दिल्ली-एनसीआरमध्ये दुधाच्या किमतीत प्रतिलिटर तीन रुपये दरवाढ केली आहे.

पुण्यात शनिवारी दूध खरेदी विक्रीच्या दराचा आढावा घेण्यासाठी सहकारी व खासगी दूध व्यावसायिकांच्या दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाची कात्रज डेअरी येथे झाली, त्या सभेत दरवाढीबाबत निर्णय घेण्यात आला. विक्री दरात दोन रुपयांनी वाढ करतानाच शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करताना लिटरमागे एक रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. दरम्यान, म्हशीच्या दुधात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही असंही या सभेत स्पष्ट करण्यात आलं.

त्याशिवाय, देशातील प्रसिद्ध कंपनी अमूलने आपल्या अमूल गोल्ड आणि अमूल ताजा या दुधाच्या दरांमध्ये दोन रुपये वाढ केली आहे. मुंबईसह महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि पश्चिम बंगलामध्ये रविवारपासून ही दरवाढ लागू होणार आहे. मदर डेअरीनेही दिल्ली-एनसीआरमध्ये प्रतिलिटर तीन रुपये दरवाढ लागू केली आहे.