क्लिंटन यांच्या प्रचारकांचा आरोप

अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेचे अध्यक्ष पॉल मॅनफोर्ट यांनी राजीनामा दिला असून त्यामुळे ट्रम्प व रशिया-युक्रेनमधील क्रेमलिन समर्थक गटांचे संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा आरोप डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या प्रचारकांनी केला आहे.

क्लिंटन यांच्या प्रचारमोहिमेचे व्यवस्थापक रॉबी मूक यांनी सांगितले की, मॅनफोर्ट यांचा राजीनामा म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक व रशिया-युक्रेन यांचे संबंध असल्याची कबुलीच आहे. मॅनफोर्ट हे ट्रम्प यांच्या प्रचारमोहिमेतील प्रमुख पदाधिकारी होते व त्यांनी काल राजीनामा दिला होता. मूक यांनी सांगितले की, हा या प्रकरणाचा शेवट नाही ती सुरुवात आहे. तुम्ही मॅनफोर्ट यांच्यापासून मुक्त झाला असाल तरी ट्रम्प व पुतिन यांचे साटेलोटे लपून राहणारे नाही. ट्रम्प यांना आणखी गंभीर प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. पुतिन यांचे पोपट म्हणून ट्रम्प काम करीत आहेत. कार्टर पेज व माईर फ्लीन या प्रचार सल्लागारांचे रशियाशी संबंध आहेत. रशियन सरकारने अलीकडेच डेमोक्रॅटिक पक्षाच्या माहितीचे हॅकिंग केले होते. ब्रेटबर्टने क्रेमलिनच्या युक्रेनबाबत भूमिकेचे समर्थन केले होते. रशियाशी ट्रम्प यांचे व्यापारी संबंध आहेत व त्याचा परिणाम त्यांच्या रशियाशी असलेल्या संबंधांवर झालेला आहे. काही व्यापारी व व्यावसायिक गटांचे क्रेमलिनशी निकटचे संबंध आहेत व ते गट ट्रम्प यांना सहकार्य करीत आहेत. त्या भागात त्यांचे आर्थिक हितसंबंध आहेत. त्यामुळे ते सारखे पुतिन यांचे कौतुक करीत आहेत, असे डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीचे प्रसिद्धी सचिव मार्क पॉशेनबाख यांनी सांगितले.

 

मध्यपूर्वेतील बिघडलेल्या परिस्थितीवर क्लिंटन यांनी माफी मागावी – ट्रम्प

वॉशिंग्टन : डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी त्या परराष्ट्र मंत्री असताना मध्यपूर्वेत मृत्यू व विध्वंसाचे तांडव घडवून आणले त्याबाबत त्यांनी माफी मागावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षीय उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

ट्रम्प यांनी मिशीगन येथील प्रचारसभेत असा आरोप केला की, क्लिंटन यांचा परराष्ट्रमंत्री असतानाचा काळ अमेरिकी इतिहासात विध्वंसक होता, पण त्याचा श्रीमती क्लिंटन यांना कधी पश्चात्ताप वाटत नाही. त्यांचे निर्णय चुकीचे होते म्हणूनच आयसिस वाढले आणि जगाची डोकेदुखी सुरू झाली, पण त्यांनी कधीही मध्यपूर्वेत केलेल्या विध्वंसाबाबत माफी मागितली नाही, ती त्यांनी मागितली पाहिजे. २००९ मध्ये म्हणजे हिलरी यांच्या आधीच्या काळात इराकमध्ये हिंसाचार कमी होता, लिबियात स्थिरता होती तर सीरियातील स्थिती नियंत्रणात होती. आयसिस नष्ट होण्याच्या मार्गावर होता, इराणला र्निबधांनी जखडलेले होते. आता परिस्थिती बघा, हिलरी परराष्ट्र मंत्री होत्या त्यानंतरच्या काळात इराकमध्ये अनागोंदी माजली. सीरियात यादवी उसळली, युरोपमध्ये शरणार्थीचा पेच सुरू झाला. हजारो लोक येऊ लागले. आयसिसने जगाल विळखा घातला. इराण हा दहशतवादाचा मोठा पुरस्कर्ता बनला. त्यांना अमेरिकेने ४०० दशलक्ष डॉलर्सची खंडणी दिली. ओबामा यांना आम्ही या प्रकरणात ते किती खोटे बोलतात हे दाखवून दिले आहे. क्लिंटन यांचा वारसा विध्वंस, विनाश व दहशतवादाचा आहे, अमेरिकेला चांगल्या संपन्न वारशाची गरज आहे. हा बदल मी घडवून आणीन. हिलरी क्लिंटन यांना कशाचाच पश्चात्ताप वाटत नाही. आयसिसचा प्रसार, बेंगझाई प्रकरण, इमेल घोटाळा यात त्यांना काही चुकीचे वाटत नाही. त्यांचा सार्वजनिक भ्रष्टाचार ३३ हजार इमेलमधून उघड झाला आहे, त्यांनी ते इमेल काढून टाकले होते.