ज्ञानपीठ विजेत्या लेखिका कृष्णा सोबतीयांचे दिल्लीत शुक्रवारी निधन झाले.  त्या ९३ वर्षांच्या होत्या. येथील रुग्णालयात त्यांना दोन महिन्यांपूर्वी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असे त्यांचे स्नेही व राजक मल प्रकाशनचे व्यवस्थापकीय संचालक अशोक माहेश्वरी यांनी सांगितले.

कृष्णा सोबती यांच्या वयाची फेब्रुवारीत ९४ वर्षे पूर्ण होणार होती. गेला एक आठवडा त्या अतिदक्षता विभागात होत्या. सायंकाळी निगम बोध घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वृद्धापकाळातही त्यांना समाजातील घडामोडींची जाणीव होती. कृष्णा सोबती या संवेदनशील व सजग लेखिका होत्या. साहित्यात त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली होती. ‘छन्ना’ हे त्यांचे पुस्तक ११ जानेवारीला नवी दिल्ली जागतिक पुस्तक जत्रेत प्रकाशित करण्यात आले होते. खरेतर हे पुस्तक म्हणजे त्यांची साठ वर्षांपूर्वी लिहिलेली पहिली कादंबरी आहे. काही कारणास्तव ती प्रकाशित झाली नव्हती.

सोबती यांचा जन्म १९२५ मध्ये झाला. ‘स्त्री ओळख व लैंगिकता’ यावर त्यांनी लेखन केले.  ‘मित्रों मर्जानी’, ‘जिंदगीनामा’, ‘सूरजमुखी अंधेरे के’ ही त्यांची आणखी पुस्तके आहेत. त्यांना साहित्य अकादमी, ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले, त्यांना पद्मभूषणही देऊ केले होते पण ते त्यांनी नाकारले. कवी अशोक वाजपेयी यांनी सांगितले, की त्यांनी साहित्यातून लोकशाहीच्या विश्वस्त म्हणून भूमिका पार पाडली. साहित्यात त्यांचे योगदान अजोड असून समता, न्याय यासाठी त्यांनी लढा दिला. त्यांनी हिंदीतून लेखन केले असले, तरी संपूर्ण भारतीय साहित्यात त्यांचे मोठे योगदान राहिले. स्त्रियांच्या सन्मानाचा मुद्दा त्यांनी लेखनातून पहिल्यांदा मांडला, असे कवी अशोक चक्रधर यांनी सांगितले. त्यांच्या ‘मित्रों मर्जानी’ या संग्रहाने भारतीय साहित्यातील शैलीत एक वेगळे वळण आणले, त्यांच्या निधनाने देशाचेच नव्हे तर जगाचे नुकसान झाले आहे.