प्रचंड वेगानं पसरत असेल्या ‘कोरोना व्हायरस’मुळे व्हायरसमुळे जगभरात आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. चीनमध्ये या विषाणुमुळे शेकडो जणांचे प्राण गेले असून, या विषाणुवर जगभरात संशोधन सुरू असताना हिंदू महासभेनं कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी धक्कादायक औषध सांगितलं आहे. “गोमूत्राचं प्राशन करून ओम नम शिवाय असा जप करत शेणाचं सेवन केल्यास ‘कोरोना व्हायरस’चा संसर्ग होणार नाही,” असा दावा हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी केला आहे.

‘कोरोना व्हायरस’नं चीनमध्ये थैमान घातलं आहे. चीनमध्ये आतापर्यंत २५९ नागरिक मरण पावले आहेत. तर ११ हजार लोकांना या आजाराचं संसर्ग झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनंही झपाट्यानं पसरत असलेल्या या आजारावर चिंता व्यक्त केली असून, आणीबाणी जाहीर केली आहे. भारतातही या विषाणुचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. भारतासह अनेक देशांनी चीनमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांना हलवण्याचे काम हाती घेतले आहेत. अशात हिंदू महासभेनं कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी भलताच सल्ला दिला आहे.

हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी कोरोना व्हायरस न होण्यासाठी हा प्रतिबंधात्मक उपाय सुचवला आहे. “गोमूत्र प्राशन केल्यानं आणि गाईचं शेण सेवन केल्यानं कोरोना व्हायरसचा संसर्ग थांबू शकतो. कोणत्याही व्यक्तीनं ओम नमः शिवाय म्हणत गाईच्या शेण शरीरावर लावल्यास तो आजारापासून वाचू शकतो. तसेच कोरोना व्हायरसचा नाश करण्यासाठी लवकरच यज्ञ करणार आहे,” असं स्वामी चक्रपाणी महाराज म्हणाले. स्वामी चक्रपाणी महाराज यांनी सूचवलेल्या उपायावर आश्चर्य व्यक्त होत आहे.

‘कोरोना व्हायरस’वर सध्या चीनमध्ये उपचार शोधण्यासाठी संशोधन सुरू आहे. शास्त्रज्ञ या व्हायरसचा अभ्यास करत आहेत. मात्र, अजून तरी या व्हायरस प्रतिबंध करेल अशा प्रतिकारक औषधाला परवानगी देण्यात आलेली नाही, असं चीनच्या आरोग्य खात्यानं म्हटलं आहे.