उत्तर प्रदेशच्या अलीगडमध्ये पोलिसांनी २१ वर्षाच्या एका तरुणाला अटक केली आहे. तरुणाच्या कुटुंबियांनी आणि काही संघटनांनी रविवारी कुवारसी पोलीस स्थानकाबाहेर गोंधळ घातला होता. तरुणाचं बळजबरी धर्मपरिवर्तन करण्यात आलं आहे, असा आरोप त्यांनी केला होता. पोलिसांनी तरुणावर सीआरपीसी कलम १५१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आमचा मुलगा एका मुस्लिम मुलीच्या प्रेमात पडला आहे, अशी तक्रार तरुणाच्या कुटुंबियांनी केली होती. मुलीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्याचा त्याच्यावर दबाव होता, असा आरोप तरुणाच्या कुटुंबियांनी केला आहे. मात्र, मी स्वतःहून धर्म स्वीकारला आणि त्यासाठी कुणाचाही दबाव नव्हता, असं तरुणाने म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेद प्रकाश हा जाफराबाद परिसरात राहतो आणि एका फर्निचर दुकानात तो काम करतो. आठ महिन्यांपूर्वी त्याने धर्मपरिवर्तन केलं आणि स्वतःचं नाव बदलून आदिल ठेवलं. हा सर्व प्रकार शनिवारी उघडकीस आला, ज्यावेळी कुटुंबियांसोबत बोलताना त्याने घराजवळ राहणाऱ्या मुस्लिम तरुणीसोबत लग्न करण्याचा मुद्दा उपस्थित केला. कुटुंबियांनी विरोध केल्यानंतर त्याने मी इस्लाम धर्म स्वीकारल्याचं सांगितलं. तरुणाच्या कुटुंबियांना याबाबत समजल्यानंतर त्यांनी काही धार्मिक संघटनांशी संपर्क केला. त्यानंतर संघटनेच्या लोकांसोबत जाऊन त्यांनी पोलीस स्थानकात बळजबरी धर्मपरिवर्तन करण्याची तक्रार दाखल केली.

दरम्यान, मी स्वतःच धर्म बदलला असून त्यासाठी कोणाचाही दबाव नव्हता अशी कबुली तरुणाने पोलिसांसमोर दिली. तरुणाची आई नेमवती देवीने सांगितलं की, वसीम उर्फ छोटू नावाचा एक मुस्लिम तरुण त्यांच्या मुलासोबत फर्निचरच्या दुकानात काम करत होता. वसीमने त्याच्या बहिणीसोबत वेद प्रकाशचं लग्न करण्यासाठी धर्मपरिवर्तन करण्यास सांगितलं होतं असा आऱोप नेमवती देवींनी केला.

पोलिसांनी वेद प्रकाश उर्फ आदिल याच्यासोबत खुर्रम नावाच्या दुसऱ्या व्यक्तीलाही अटक केली आहे. वेद प्रकाशचा धर्मपरिवर्तन करण्यामध्ये खुर्रमचा हात होता असा आरोप आहे. मात्र, मी आदिलला केवळ १५ दिवसांपासून ओळखतो, मशिदीत आदिल नमाज पठण करायला आल्यापासून आमची ओळख झाली असं खुर्रम म्हणाला. भाजपच्या अलीगढ युनिटच्या सरचिटणीस रीता राजपूत यांनी टाइम्स ऑफ इंडियासोबत बोलताना धर्मपरिवर्तनासाठी तरुणावर बळजबरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.