भाजप खासदार आणि विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांकडून वादग्रस्त विधानांची मालिका मोदींच्या उपदेशानंतरही थांबण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. प्रत्येक हिंदू कुटुंबाने कमीत कमी चार मुलांना जन्म दिला पाहिजे, असे विधान विहिंप नेत्या साध्वी प्राची यांनी केले आहे. यापूर्वी भाजप खासदार साक्षी महाराज यांनी हिंदू महिलेने चार मुलांना जन्म दिला पाहिजे अशी मुक्ताफळे उधळली होती.
विहिंपकडून भिलवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘विराट हिंदू‘ संमेलनात बोलताना साध्वी प्राची यांनी ‘हम दो, हमारे चार’चा नारा दिला. साध्वी प्राची म्हणाल्या की, ‘‘हम दो, हमारे दो अशी पहिली घोषणा होती. त्यानंतर ‘शेर का बच्चा एकही अच्छा’ ही घोषणा दिली गेली. पण वाघाचा एक बछडा काय-काय करणार. एक मुलाने देशाचे रक्षण होणार नाही. एकाला सीमेवर पाठविले पाहिजे. दुसऱ्याला संतांच्या हाती दिले पाहिजे. तर, तिसऱ्याला विहिंपकडून समाजात होत असलेल्या कामांना समर्पित केले पाहिजे आणि चौथ्याला भारतीय संस्कृतीचे संरक्षण करण्याची जबाबदारी दिली पाहिजे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला चार आपत्ये असणे गरजेचे आहे.”  
याआधी भाजप खासदार साक्षी महाराज यांनीही अशाच प्रकारचे विधान करून वाद निर्माण केला होता. हिंदू महिलांना किमान चार मुले तरी असली पाहिजेत, असे गजब विधान भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केले होते. यावर काँग्रेसने जोरदार टीका करत ‘अब की बार बच्चे चार‘ या ब्रीदवाक्यावर भाजप पुढील निवडणूक लढविणार असल्याचा टोला हाणला होता.