देशातल्या पाच राज्यांमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार जोरात सुरु आहे. यात तेलंगणमधल्या अकुला हनुमंत या अपक्ष उमेदवाराने आपल्या हटके प्रचाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तेलंगणच्या जगतियाल जिल्ह्यातील कोरुतला विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे अकुला हनुमंत हातात चप्पल घेऊन दारोदार प्रचारासाठी फिरत आहेत.

निवडणूक जिंकल्यानंतर मी तुमचे काम केले नाही तर मला चप्पलने झोडून काढा असे त्यांनी आपल्या मतदारांना सांगितले आहे. आपल्या शब्दावर मतदारांनी विश्वास ठेवावा यासाठी प्रचारा दरम्यान ते मतदारांच्या हातात चप्पलही देत आहेत.

हनुमंत यांच्या प्रचाराचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून अन्य राजकरण्यांनीही हनुमंत यांचे अनुकरण करावे अशी लोकांमध्ये चर्चा आहे. मतदारसंघात विकास करु शकलो नाही तर राजीनामा देईन असे त्यांनी मतदारांना सांगितले आहे. मी चांगले काम करु शकलो नाही तर मतदारांना मला चप्पलने झोडून काढण्याचा पूर्ण अधिकार आहे असे हनुमंत यांनी सांगितले. तेलंगण राष्ट्र समितीचे वरिष्ठ नेते आणि आमदार के. विद्यासागर राव कोरुतला विधानसभेचे प्रतिनिधीत्व करतात. या मतदारसंघामध्ये प्रतिष्ठेची लढाई आहे. तेलंगणमध्ये ७ डिसेंबरला मतदान होणार आहे.