वादाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची आज (सोमवार) मुंबईतील मुख्यालयात सर्वसाधारण सभा पार पडत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी या शिखर बँकेच्या प्रमुखांना थेट आवाहन केले आहे. जर उर्जित पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कणा असेल अर्थात त्यांचा स्वाभिमान जागा असेल तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांची जागा दाखवावी, असे राहुल गांधींनी म्हटले आहे. त्याचबरोबर मोदींनी देशातील सर्व स्वायत्त संस्थांना उध्वस्त करण्याचे काम केल्याचा गंभीर आरोपही राहुल यांनी केला आहे.

आरबीआय आणि सरकारमध्ये नुकतेच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अर्थ मंत्रालयाने इतिहासात कधीही झाली नाही अशी कृती आरबीआयसोबत केली. आरबीआय काद्यातील कलम ७चा वापर सरकारने बँकेवर केला. या कलमाचे वैशिष्ट म्हणजे आरबीआय जरी स्वायत्त असली तरी गव्हर्नरांना सरकार थेट आदेश देऊ शकते.

दरम्यान, आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तसेच सरकार आणि आरबीआयमध्ये सुरु असलेल्या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. या पार्श्वभूमीवर आज सकाळी मुंबईत आरबीआयची सर्वसाधारण सभा पार पडत आहे. या सभेमध्ये वादाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

अद्याप या सभेतील चर्चेची माहिती समोर आलेली नाही, मात्र ही माहिती जाहीर होताच अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.