उजव्या पायाला दुखापत झालेली असताना डाव्या पायाची शस्त्रक्रिया करण्याची ‘कमाल’ दिल्लीमधील एका नामांकित रुग्णालयाने केली आहे. या प्रकरणी रुग्णाच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने शस्त्रक्रिया करणाऱ्या शल्यविशारदासह शस्त्रक्रिया करण्यास मदत करणाऱ्या अन्य पाच कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित केले आहे. दिल्लीतील शालिमार बागेतील फोर्टिस रुग्णालयात हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवि राय मंगळवारी रात्री त्यांच्या घरामध्ये जिन्यावरून घसरून पडले. त्यांच्या उजव्या पायाला तीव्र दुखापत झाल्यामुळे त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. पायाचा एक्स रे काढल्यावर डॉक्टरांनी राय यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगितले. यानंतर लगेचच रवि राय यांना शस्त्रक्रिया विभागात नेण्यात आले. शस्त्रक्रिया झाल्यावर पुन्हा त्यांना त्यांच्या खोलीमध्ये आणल्यावर उजव्या पायाऐवजी राय यांच्या डाव्या पायाला बॅंडेज केलेले असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांना दिसले. त्यांनी लगेचच या बद्दल डॉक्टरांकडे तक्रार केली. त्यानंतर डॉक्टरांना आपण चुकीच्या पायावर शस्त्रक्रिया केल्याचे समजले. या प्रकारानंतर राय यांच्या कुटुंबीयांना तीव्र संताप व्यक्त केल्यावर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर तिथे आले आणि त्यांनी घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्याचबरोबर आम्ही त्यांच्या डाव्या पायावर लगेचच शस्त्रक्रिया करू असेही नातेवाईकांना सांगण्यात आले.
या प्रकारानंतर रवि राय यांचे वडील रामकरण राय यांनी पोलिसांकडे याबद्दल तक्रार दाखल केली. त्यानंतर रुग्णालयाने शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांसह सहा जणांना तातडीने निलंबित केले.