पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ ऑगस्ट रोजी डिस्कव्हरी चॅनलवरील प्रसिद्ध ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमाच्या विशेष भागात बेअर ग्रिल्स बरोबर दिसून आले होते. या विशेष भागामुळे ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ ला जगातील सर्वाधिक ट्रेंडिग शो होण्याचा मान मिळाला होता.  या विशेष कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी आणि बेअर ग्रिल्स यांनी एकमेकांबरोबर आपल्या अनेक अनुभवांविषयी चर्चा केली होती. याचबरोबर जीम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातील घनदाट जंगलामधून प्रवासही केला होता. हा कार्यक्रम सर्वत्र प्रसारित झाल्यानंतर जवळपास सर्वांनाच एका गोष्टीबाबत प्रश्न पडला होता की? या संपूर्ण कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे हिंदीत बोलत होते मग इंग्रजी भाषा समजणाऱ्या बेअर ग्रिल्सला त्यांचे बोलणे कसे काय समजले? त्यांनी आपसात चर्चा कशी काय केली? या प्रश्नाचे उत्तर पंतप्रधान मोदींनी स्वतः आपल्या मन की बात कार्यक्रमाच्या माध्यामातून दिले आहे.

पंतप्रधान मोदींनी याबाबत सांगताना म्हटले की, अनेक जणांची हे जाणून घ्यायची इच्छा आहे की बेअर ग्रिल्सला हिंदी कशी काय समजली? लोकांनी हे देखील विचारले की हा कार्यक्रम दाखवण्या अगोदर एडिट केला होता का? की या कार्यक्रमाचे अनेकवेळा शुटींग करण्यात आले होते? मात्र असे काहीच नव्हते, म्हणूच मी लोकांच्या मनातील या शंकांबाबत खुलासा करत आहे. खरतर यात रहस्यमय असे काहीच नाही, माझ्या आणि बेअर ग्रिल्सच्या दरम्यान तंत्रज्ञानाने अहम भूमिका निभावली. एक कॉडलेस डिवाइस बेअर ग्रिल्सच्या कानाला जोडलेले होते, जे अतिशय वेगाने हिंदीला इंग्रजीत भाषांतरीत करत होते. मी त्यांच्याशी हिंदीत बोलायचो व ते इंग्रजीत ऐकत होते. याप्रकारे आमच्या दोघांमधील संवाद अतिशय सोपा व हलकाफुलका झाला, हा तंत्रज्ञानाचा चमत्कार आहे.

पंतप्रधान मोदींनी यावेळी हे देखील सांगितले की, आपण निसर्ग आणि वन्यजीवांशी निगडीत असलेल्या ठिकाणांना भेट दिली पाहिजे. जसे की मी या अगोदरही म्हटले होते व आताही सांगतो की आपण आयुष्यात एकदातरी ईशान्य भारताला भेट द्यायला हवी.

या कार्यक्रमामध्ये मोदींनी बेअरबरोबर अगदी त्यांचे बालपण कसे गेले इथपासून ते त्यांचा जंगलात राहण्याचा अनुभव इथपर्यंत अनेक गोष्टींवर चर्चा केली. प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी आणि वातावरणातील बदलाकडे लक्ष्य वेधण्यासाठी या विशेष भागाचे चित्रिकरण करण्यात आले होते. विशेष म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यानंतर देशाच्या प्रमुखपदी असताना ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’मध्ये सहभागी होणारे पंतप्रधान मोदी हे केवळ दुसरे नेते ठरले.