लघुग्रहाच्या आघातानंतर पृथ्वी थंड होत गेली व त्यामुळे ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी डायनॉसॉर्स नष्ट झाले असे एका नवीन अभ्यासात म्हटले आहे.

डायनॉसॉर्सच्या मृत्यूनंतर सस्तन प्राण्यांचा उदय झाला व नंतर पृथ्वीवर माणसांचे साम्राज्य आले. जर्मनीतील पोस्टडॅम इन्स्टिटय़ूट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रीसर्च या संस्थेच्या वैज्ञानिकांनी लघुग्रह आघाताच्या वेळी सल्फ्युरिक आम्लाचे जे थेंब पडले होते तशा थेंबांची पुन्हा निर्मिती केली. त्या वेळी सूर्यप्रकाश झाकोळला होता व त्याचा पृथ्वीवर विपरीत परिणाम झाला. वनस्पती मेल्या. अन्नाच्या जाळय़ातून मृत्यूचे तांडव झाले व मोठय़ा प्रमाणात आघातात धूळ निर्माण झाली. संगणकीय सादृश्यीकरणात असे दिसून आले, की सल्फ्युरिक आम्लाचे थेंब पडल्यानंतर पृथ्वी कमालीची थंड पडली त्यामुळे डायनॉसॉर्सचा मृत्यू झाला. महासागरांचे मिश्रण झाल्यानेही पृथ्वी थंड झाली असण्याची शक्यता आहे, त्यामुळे सागरी जीव नष्ट झाले. लघुग्रहाच्या आघातानंतर मेक्सिकोत चिक्सलब हे विवर बनले होते, त्यामुळे पृथ्वीचा इतिहास बदलला असे ज्युलिया ब्रगर यांनी म्हटले आहे. क्रॅटॅशियस काळाच्या अखेरीस मोठय़ा प्रमाणावर बदल झाले होते. वैज्ञानिकांनी प्रथमच संगणकीय सादृश्यीकरणाचा वापर करून हवामान प्रारूप वातावरण, महासागर व सागरी बर्फास लावले आहे. त्या वेळी सल्फर असलेले वायू आघातानंतर तयार झाले होते व त्यामुळे पृथ्वीवरचा सूर्यप्रकाश बंद झाला. परिणामी, तापमान २७ अंशावरून पाच अंशापर्यंत खाली आले व थंडीमुळे खूप बदल झाले. जागतिक वार्षिक पृष्ठीय हवा तापमान २६ अंशांनी घसरले होते व त्यामुळे तीन वर्षे तापमान गोठणबिंदूच्या खाली होते. सल्फेट एरोसेलमुळे थंड वातावरण बनले होते, असे जॉर्ज फेलनर यांनी म्हटले आहे. जिओफिजिकल रीसर्च लेटर्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.