लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयाचे ‘सबकुछ’ असलेले भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शनिवारी देशाच्या राजधानीत जंगी स्वागत करण्यात आले. नवी दिल्ली विमानतळापासून भाजपचे मुख्यालय असलेल्या अशोका रोडपर्यंत मोदींना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाजपचे हजारो कार्यकर्ते जमले होते. मोदीनामाचा जयघोष आणि ठिकठिकाणी त्यांच्यावर होणारी पुष्पवृष्टी यांनी नवी दिल्लीतील वातावरण अवघे ‘मोदीमय’ झाले होते.
लोकसभा निकालांनंतर दुसऱ्या दिवशी मोदी नवी दिल्लीत दाखल होणार असल्याचे आधीपासूनच जाहीर असल्याने भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जंगी तयारी केली होती. मोदींनीही विमानतळापासून पक्षाच्या मुख्यालयापर्यंत ‘रोड शो’ काढून विजयीयात्राच साजरी केली. दिल्लीच्या रस्त्यारस्त्यांवर मोदींना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. विमानतळ ते भाजप मुख्यालय हे १६ किमीचे अंतर कापण्यासाठी मोदींना अडीच तास लागले. शेकडो भाजपसमर्थक मोटरसायकलवर मोदींच्या ताफ्यात सहभागी झाले होते. काही उड्डाणपुलांवर मोदींना पाहण्यासाठी तोबा गर्दी झाली होती. भाजप मुख्यालयात मोदींवर गुलाबपुष्प उधळण्यात आले. मुख्यालयाजवळ मोदींना पाहण्यासाठी पुढे जाणाऱ्या कार्यकर्त्यांना एका सुरक्षारक्षकाने धक्काबुक्की केल्यावर मोदींनी त्यास तसे न करण्याची सूचना केली. कार्यकर्त्यांच्या अलोट गर्दीत मोदी भाजप बैठकीच्या ठिकाणी पोहोचले.
भाजपच्या बैठकीत लालकृष्ण अडवाणींसह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक येत्या २० तारखेला करण्याचे निश्चित करण्यात आले. या बैठकीनंतर एनडीएतील घटक पक्षांचीही बैठक होणार आहे. या बैठकीनंतर मोदी राष्ट्रपतींना भेटून सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. नव्या सरकारच्या शपथविधीची तारीखही त्या वेळीच निश्चित करण्यात येईल, असे पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी सांगितले.
वाराणसीतून प्रचंड मतांनी निवडून आलेल्या नरेंद्र मोदींनी शनिवारी वाराणसीला भेट देऊन काशी विश्वनाथ मंदिरात पूजा केली. त्यानंतर दशाश्वमेध घाटावर जाऊन त्यांनी गंगाआरतीतही सहभाग घेतला. या वेळी त्यांच्यासोबत राजनाथ सिंह आणि अमित शाह हे उपस्थित होते. यावेळी बोलताना मोदींनी काँग्रेसवर टीका केली.
“वाराणसीने मला प्रेम दिले. जिल्हा प्रशासनाने मला प्रचारासाठी सभा घेण्यास परवानगी नाकारली होती. मात्र मला ३ लाख ७० हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी करीत त्या प्रशासनास तुम्ही मतदारांनी धडा शिकवल्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे.”
– नरेंद्र मोदी