हाथरस पीडितेच्या पार्थिवावर मध्यरात्री अंत्यसंस्कार करून तिच्या मानवाधिकारांचे उल्लंघन करण्यात आले आहे. या सगळ्या प्रकारात पोलिसांनी दिलेली कारणे असमर्थनीय आहेत, असे ताशेरे अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने मंगळवारी पोलीस, प्रशासनावर ओढले.

हाथरस पीडितेवर १४ सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप असून, दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात २९ सप्टेंबरला तिचा मृत्यू झाला. स्थानिक प्रशासनाने तिच्या पार्थिवावर मध्यरात्री घाईघाईने अंत्यसंस्कार केल्याने देशभरात तीव्र पडसाद उमटले. न्या. पंकज मिथल व न्या. रंजन रॉय यांनी हा मुद्दा उपस्थित या प्रकाराची जबाबदारी निश्चित करावी, असे आदेश दिले. तसेच अशा प्रकरणांत पीडितांवरील अंत्यसंस्काराबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करावीत, असे निर्देश न्यायालयाने दिले.

आपला देश मानवतेचा धर्म पाळणारा आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पीडितेच्या पार्थिवावर मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा असला तरी तो समर्थनीय नाही. पीडितेच्या पार्थिवावर किमान सन्मानाने अंत्यसंस्कार व्हायला हवे होते. पीडितेचा मृतदेह काही विधींसाठी निदान अर्धा तास तरी कुटुंबीयांच्या ताब्यात द्यायला हवा होता. नंतरच अंत्यसंस्कार करायला हवे होते, असे न्यायालयाने नमूद केले.

पीडितेवर बलात्कार झालाच नाही, असे विधान अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांतकुमार यांनी केले होते. मात्र, तपासाशी थेट संबंध नसताना असे विधान करणे चुकीचे होते. २०१३ मध्ये बलात्काराची व्याख्या बदललेली आहे, याची तुम्हाला कल्पना आहे का, अशी विचारणा न्यायालयाने केली. जिल्हाधिकारी प्रवीण कुमार यांच्याही अशाच विधानाबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन उत्तर प्रदेशचे अधिकारी, राजकीय पक्ष व इतर सर्वानीच जाहीर विधाने टाळावीत, अशी सूचना न्यायालयाने केली. वृत्तवाहिन्या आणि मुद्रित माध्यमांनीही या प्रकरणाचे वार्ताकन करताना आणि या विषयावर चर्चा करताना संयम पाळण्याची अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली.

कुटुंबीयांच्या इच्छेविरोधात..

पीडितेच्या पार्थिवावर दुसऱ्या दिवशी सकाळी अंत्यसंस्कार करण्याचा आग्रह कुटुंबीयांनी धरला होता. मात्र, ती विनंती धुडकावून आपल्या इच्छेविरोधात घाईघाईने मध्यरात्री अंत्यविधी उरकण्यात आला, असे कुटुंबातील सदस्यांनी न्यायालयात सांगितले. अंत्यविधीवेळी कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित नव्हता, याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले.

सीबीआय पथक घटनास्थळी

हाथरस प्रकरणी सीबीआयने पीडितेच्या कुटुंबीयांचे जाबजबाब नोंदवले. गुन्हा घडलेल्या दिवशीच्या घटनांबाबत सीबीआयने पीडितेच्या भावासह अन्य सदस्यांकडून माहिती घेतली. तसेच सीबीआय पथकाने घटनास्थळाला भेट दिली.