हैदराबादमधील रंजीता हत्या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. आई बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांच्या तपासामध्ये आपण आईची  हत्या केल्याची कबुली देणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थिनीने मित्राच्या दबावाखाली येऊन गुन्हा केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये पदवीच्या दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या किर्ती रेड्डी या तरुणीचे प्रियकर बाल रेड्डीबरोबर शारीरीक संबंध होते. ही गोष्ट किर्तीच्या शेजरी राहणाऱ्या शशीला ठाऊक होती. यावरुनच तो तिला पैश्यांची मागणी करत ब्लॅकमेल करत होता. याच दबावाला बळी पडून किर्तीने आपल्याचा आईची हत्या केली.

या प्रकरणामध्ये पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किर्ती आणि बाल यांचे शरीरसंबंध असल्याची माहिती शशीला होती. यावरुनच तो किर्तीला कायम ब्लॅकमेल करत असे. “१० लाख रुपये दे नाहीतर मी तुझ्या आईला तुमच्या दोघांबद्दल सगळं काही सांगेन,” अशी धमकी शशी किर्तीला द्यायचा. किर्तीने यासंदर्भात आपल्या आईला कोणताही माहिती न देता शशीच्या म्हणण्याप्रमाणे तिचीच हत्या केली. किर्ती एकुलती एक असल्याने आईच्या मृत्यूनंतर सर्व संपत्ती तिला मिळेल. त्यामधून १० लाख रुपये ती शशीला देईल असं या दोघांनी ठरवल्याची माहिती पोलिसांनी केलेल्या चौकशीमधून समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी किर्तीचा प्रियकर बाल यालाही अटक केली आहे. किर्ती अल्पवयीन असताना तिच्याबरोबर शरीरसंबंध ठेवण्याबरोबरच ती गरोदर राहिली असता तिला गर्भपात करायला भाग पाडल्याप्रकरणी बाल याला अटक करण्यात आली आहे.

किर्तीचे वडील श्रीनिवास हे ट्रक चालक असून ते कामानिमित्त शहराबाहेर असताना १९ ऑक्टोबर रोजी तिने शशीच्या मदतीने आईची हत्या केली. रंजीता या रात्री आपल्या राहत्या घरामध्ये मोबाईल बघत बेडवर पडलेल्या असताना किर्तीने त्यांच्या डोळ्यामध्ये मिरची पूड फेकली. “मिरची पावडर फेकल्यानंतर किर्तीने घरातील सर्व दिवे लावले. त्यानंतर किर्ती आईच्या अंगावर बसली आणि तिचे हात घट्ट पकडून ठेवले. त्यानंतर शशीने टॉवेलने रंजीता यांचा गळा दाबून हत्या केली,” अशी माहिती रांचकोडाचे पोलिस अधिक्षक महेश भागवत यांनी गुरुवारी दिली.

आपल्या आईची हत्या केल्यानंतर किर्ती आणि शशी २२ तारखेपर्यंत त्याच खोलीत रंजीता यांच्या मृतदेहाबरोबर राहिले. या दोन दिवसांमध्ये किर्ती आणि शशीने शरीरसंबंधही ठेवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दोन दिवसांनंतर रंजीता यांच्या मृतदेहाचा दुर्गंध येऊ लागला. त्यावेळी किर्ती आणि शशीने त्याच्या गाडीमधून हा मृतदेह तुम्मालगुडा येथील रेल्वे स्थानकाजवळ नेऊन रेल्वेच्या रुळांवर टाकून दिला. रंजीता यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे दाखवण्यासाठी त्यांनी मृतदेह रेल्वे रुळावर टाकल्याची कबुली या दोघांनी दिली. या दोघांनी घरामधील चादर आणि ज्या टॉवेलने गळा आवळला तो टॉवेल जाळून टाकला.

आईचा मृतदेह रेल्वे रुळांवर टाकून दिल्यानंतर किर्तीने तिच्या मोबाईलवरुन बाल रेड्डीच्या वडिलांना फोन करुन रंजीता यांच्या आवाजात किर्तीला काही दिवस तुमच्या घरी राहू द्या असं सांगितले. आपण वैद्यकीय तपासणीसाठी नालगोंडा जात असल्याने किर्तीला तुमच्याकडे राहू द्यावे असं या कॉलवर किर्तीने रंजीता बनून रेड्डी यांना सांगितले. त्यानंतर किर्ती २३ ऑक्टोबरला बाल रेड्डीच्या घरी रहायला गेली. २३ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर बाल रेड्डीच्या घरी वास्तव्यास असतानाच किर्तीने आपण विशाखापट्टणमला अभ्यास दौऱ्यासाठी आल्याची माहिती वडिलांना तसेच काही नातेवाईकांना दिली. आई-वडिलांमध्ये कडाक्याचे भांडण झाल्यामुळे आई घर सोडून निघून गेल्याचेही किर्तीने काही नातेवाईकांना फोन करुन सांगितले.

हत्या झालेल्या रंजीता यांचे पती श्रीनिवास हे २४ ऑक्टोबर रोजी घरी आले तेव्हा त्यांना दरवाजाला टाळं दिसलं. त्यांनी रंजीता यांना फोन केला असता तो नॉट रिचेबल येत होता. अखेर त्यांनी आपली मुलगी किर्ती हिला फोन केला. श्रीनिवास यांनी तिला रंजीता बेपत्ता असून तातडीने हैदराबादला परत येण्यास सांगितले. मात्र गुरुवारी झालेल्या या संवादानंतर किर्ती शनिवारी हैदराबादला परतली आणि तिने पोलिसांकडे आई बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. किर्तीने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये वडिलांना दारुचे व्यसन असून ते दारु पिऊन आईला त्रास द्यायचे असा आरोप केला. दारुच्या नशेत ते आईला बेदम मारहाण करायचे असंही किर्तीने आपल्या तक्रारीमध्ये म्हटले होते.

श्रीनिवास यांनी किर्तीकडे विशाखापट्टणमला जाण्याच्या कारणाबद्दल विचारले असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे रंजीताच्या बेपत्ता होण्यामागे किर्तीचा हात असल्याचा संशय श्रीनिवास यांना आला. रंजीता बेपत्ता असल्याचे समजल्यानंतर किर्तीचा प्रियकर बाल रेड्डीचे वडील श्रीनिवास यांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी दोघांमध्ये झालेल्या चर्चेमधून किर्तीचा खोटारडेपणा उघड झाला. “मागील काही दिवसांपासून रंजीताच्या सांगण्यावरुन किर्ती आमच्या घरी राहत होती,” अशी माहिती बाल रेड्डीच्या वडिलांनी श्रीनिवास यांना दिली. त्यानंतर श्रीनिवास यांनी पोलिसांना यासंदर्भातील माहिती दिली. पोलिसांनी किर्तीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर तिने गुन्हा कबुल करत शशीच्या मदतीने आपण आईची हत्या केल्याचे मान्य केले.

या प्रकरणी पोलिसांनी शशी आणि किर्ती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तर बालाविरोधात बलात्कार, गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शशीविरोधात खंडणीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. शशी आणि बाल या दोघांविरोधात पोलिसांनी पॉस्को कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल केला आहे.