हैदराबादमधील दिलसुखनगर भागात गुरुवारी संध्याकाळी झालेल्या बॉम्बस्फोटांचा प्राथमिक तपास पूर्ण झाला आहे. स्फोटके ठेवण्यासाठी अल्युमिनियमचे डब्बे वापरण्यात आल्याचे तपासातून स्पष्ट झालंय. अमोनियम नायट्रेटचा स्फोट घडवून आणण्यासाठी वापर करण्यात आल्याचाही अंदाज आहे.
स्फोट झाल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) एक पथक तातडीने हैदराबादला रवाना झाले. त्यांनी घटनास्थळावरून पुराव म्हणून उपयुक्त ठरणारे साहित्य गोळा केले आहे. त्याच्या अभ्यासावरून स्फोट घडविण्यासाठी कशाचा वापर करण्यात आला, याची प्राथमिक माहिती मिळली आहे.
दहशतवाद्यांनी दिलसुखनगरमध्येच का स्फोट घडविला, याचा शोध घेण्याची जबाबदारीही एनआयएकडे देण्यात आली आहे. गेल्यावर्षी पुण्यात झालेल्या कमी तीव्रतेच्या साखळी स्फोटांनंतर अटक करण्यात आलेले सईद मकबूल आणि इम्रान खान यांनी जुलै २०१२ मध्ये दिलसुखनगर भागाची रेकी केल्याची कबुली दिली
होती. दहशतवादी हल्ला करण्यासाठी दिलसुखनगर, बेगम बाजार, अबिद या भागांची त्यांनी टेहळणी केली होती. इंडियन मुजाहिदीनचा सहसंस्थापक रियाज भटकळ याच्या सांगण्यावरूनच त्यांनी ही टेहळणी केली होती.