हैदराबादमध्ये २६ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. पशुवैद्यकीय डॉक्टर असणारी ही तरुणी बुधवारपासून बेपत्ता होती. गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत शादनगर परिसरात पोलिसांना आढळला. या तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेविरोधात सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे. जंगली प्राण्यांनाही लाज वाटेल असे हे कृत्य आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया दाक्षिणात्य कलाकारांनी दिली आहे.

विजय देवरकोंडा, अनुष्का शेट्टी आणि किर्ती सुरेश या दाक्षिणात्य कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. ‘माझ्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला किंवा मैत्रिणीला असुरक्षित वाटत असेल तेव्हा मला त्यांच्याशी फोनवर बोलत राहावं लागतं. आपल्यापैकी अनेकजण असं करत असणार. ही सर्वांत भीतीदायक गोष्ट आहे. चुकीच्या वर्तणुकीविरोधात आवाज उठवायला शिका. जे माणसासारखे वागू शकत नाहीत त्यांचा मानवी हक्कांवर अधिकार नाही. आपला जीव सर्वांत महत्त्वाचा आहे. पोलिसांना फोन करण्यास कचरु नका. अडचणीत असाल तेव्हा १००/११२ या नंबरवर कॉल करा’, असं विजयने सोशल मीडियावर लिहिलंय. तर दुसरीकडे ही घटना ऐकून मन हेलावून गेल्याची प्रतिक्रिया अनुष्का शेट्टीने दिली. यावर संताप व्यक्त करत ती म्हणाली, “मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे. या गुन्हेगारांची तुलना जंगली प्राण्यांशीही करता येणार नाही. जंगली प्राण्यांनाही लाजवेल असं हे कृत्य आहे. स्त्री असणं हा या समाजात गुन्हा आहे का? तरुणीच्या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा मिळावी यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करुयात.”

राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री किर्ती सुरेशने या घटनेनंतर समाजातील वातावरणाबाबत भीती निर्माण केली. “हैदराबाद शहराला मी सुरक्षित समजायचे. पण आता या घटनेनंतर कोणाला जबाबदार ठरवायचं हेच मला कळत नाहीये. महिलांच्या बाबतीत आपला देश कधी सुरक्षित होणार? विकृत माणसांना शिक्षा ही झालीच पाहिजे आणि तीसुद्धा लवकरात लवकर. कर्मावर माझा पूर्ण विश्वास आहे”, असं किर्ती म्हणाली.