News Flash

#HyderabadHorror: बहिणीऐवजी पोलिसांना फोन केला असता तर वाचली असती? गृहमंत्र्यांनी पीडित तरुणीवरच फोडलं खापर

"पोलिसांना फोन करण्याऐवजी तिने कुटुंबाला फोन करणं दुर्दैवी आहे"

तेलंगणची राजधानी असलेल्या हैदराबाद येथे महिला पशुवैद्यकावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्यानंतर हत्या आणि नंतर मृतदेह जाळून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. एकीकडे देशभरात या घटनेवरुन संताप व्यक्त होत असताना तेलंगणचे गृहमंत्री मोहम्मद मेहमूद अली यांनी पीडित तरुणीवरच खापर फोडलं असून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. तरुणी इतकी सुशिक्षित होती तर मग पोलिसांना फोन करण्याऐवजी बहिणीला कशाला केला? अशी विचारणा त्यांनी केली आहे. जर बहिणीला फोन करण्याऐवजी तिने पोलिसांना फोन केला असता तर कदाचित वाचवता आलं असता असा दावाही त्यांनी केला आहे.

इंडिया टुडेशी बोलताना मोहम्मद मेहमूद अली यांनी म्हटलं आहे की, “पीडित तरुणी डॉक्टर असून सुशिक्षित होती. पोलिसांना फोन करण्याऐवजी तिने कुटुंबाला फोन करणं दुर्दैवी आहे. १०० नंबरवर फोन करण्याऐवजी तिने आपल्या बहिणीला फोन केला”.

“या घटनेचं आम्हाला दुख: आहे. पोलीस अलर्ट असून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवत आहेत. पीडित तरुणाने १०० नंबरवर फोन न करता बहिणीला फोन करणं दुर्दैवी आहे. १०० नंबरवर फोन केला असता तर कदाचित तिला वाचवता आलं असतं,” असं वक्तव्य मोहम्मद मेहमूद अली यांनी केलं आहे.

तरुणीने आपल्या बहिणीला फोन करुन आपण घाबरलो असल्याचं सांगितलं होतं. “मी घाबरले आहे. ते सगळे (अनोळखी लोक) बाहेर माझी वाट पाहत आहेत. तू माझ्याशी बोलत राहा, मी घाबरले आहे,” असं पीडित तरुणीने फोनवर आपल्या बहिणीला सांगितलं होतं.

चार आरोपींना अटक
तेलंगण पोलिसांना याप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, बुधवारी रात्री ९.३५ ते १० दरम्यान ही सगळा प्रकार घडला. पोलिसांनी सांगितलं आहे की, सामूहिक बलात्कारानंतर आरोपींनी डॉक्टरचा मृतदेह ट्रकमध्ये ठेवला आणि हायवेवर काही अंतरावर जाऊन एका पेट्रोल पंपावरुन पेट्रोल आणि डिझेल खरेदी केलं. यानंतर एका निर्जनस्थळी जाऊन आरोपींनी पीडित तरुणीचा मृतदेह फेकून दिला आणि पेट्रोलच्या आधारे पेटवून दिला.

आरोपींच्या चौकशीत धक्कादायक खुलासे
आरोपींची चौकशी केली असता अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. पीडित तरुणीचा आवाज कोणालाही ऐकायला जाऊ नये यासाठी आरोपींनी गुन्हा करत असताना तिचं तोंड दाबून ठेवलं होतं. श्वास घेऊ न शकल्यामुळेच गुदमरुन पीडित तरुणीचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी अजून एक खुलासा केला असून, पीडित तरुणीला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आरोपींनीच कट रचत तिच्या स्कुटीमधून हवा काढली होती.

सामूहिक बलात्कारावेळी पीडित तरुणीने मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली होती. आरोपींना यामुळे आपण पकडले जाऊ अशी भीती वाटू लागली होती. याचवेळी एका आरोपीने आवाज कोणालाही ऐकू जाऊ नये यासाठी पीडित तरुणीचं तोंड दाबून ठेवलं. यावेळी श्वास घेऊ न शकल्याने गुदमरुन पीडित तरुणीचा मृत्यू झाला.

सीसीटीव्ही आणि लोकांकडून घेतलेल्या माहितीच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. हा सर्व प्रकार व्यवस्थित कट रचून करण्यात आला असल्याचं साइबरादाबादचे पोलीस आयुक्त वीसी सज्जनर यांनी सांगितलं आहे. बुधवारी संध्याकाळी चारही आरोपींनी पीडित तरुणी टोल प्लाजावर स्कुटी उभी करत असल्याचं पाहिलं होतं.

स्कुटी दुरुस्त करण्याच्या बहाण्याने घेऊन गेले
यानंतर आरोपींनी सामूहिक बलात्काराचा कट रचला. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी आपली स्कुटी घेण्यासाठी परतली असता पंक्चर झालं असल्याचं तिने पाहिलं. पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपींनीच तरुणीच्या स्कुटीमधील हवा काढली होती. पीडित तरुणी पंक्चर झाल्यामुळे चिंतेत होती. यावेळी आरोपीने मदत करण्याचा बहाणा करत तिथे पोहोचला. त्याचा हेल्पर स्कुटी दुरुस्त करुन देतो सांगत काही दूर घेऊन गेला.

यानंतर पीडित तरुणीवर जबरदस्ती करत निर्जनस्थळी नेण्यात आलं. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. हैदराबादमधील या घटनेमुळे देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. ही निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती असल्याचं अनेकजण म्हणत आहेत. सोशल मीडियापासून ते सगळीकडेच याप्रकऱणी आवाज उठवण्यात येत असून आरोपींना कडक शिक्षा केली जावी अशी मागणी होत आहे. पीडित महिलेच्या आईने सर्व आरोपींना जिवंत जाळून टाका अशी मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी वेळीच मदत केली असती तर मुलीला वाचवता आलं असतं असा आरोप कुटुंबाने केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2019 12:11 pm

Web Title: hyderabad rape and murder telangana home minister mohammad mahmood ali sgy 87
Next Stories
1 #HyderabadHorror: आरोपींनी तोंड दाबून ठेवल्याने मदतही मागू शकली नाही तरुणी, पोलीस तपासात धक्कादायक खुलासे
2 गोव्यात राजकीय भूकंप करायला निघालेल्या राऊतांना काँग्रेसचा दणका, म्हणाले…
3 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
Just Now!
X