हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन हे औषध डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेलेच घेऊ शकतात. हे औषध सर्वांसाठी नाही असे इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन हे औषध डॉक्टर आणि COVID-19 रुग्णांच्या संपर्कात आलेलेच घेऊ शकतात असे आयसीएमआरचे वरिष्ठ वैज्ञानिक रमन आर गंगाखेडकर यांनी सांगितले. प्रत्येकाने हे औषध घेऊ नये असे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या करोना व्हायरसवर हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन हे औषध अत्यंत प्रभावी ठरत आहे. त्यामुळे काही जण डॉक्टरांच्या  सल्ल्याशिवाय स्वत:च करोनाची बाधा होऊ नये म्हणून हे औषध घेत आहेत. अशा लोकांना आयसीएमआरने पुन्हा एकदा सावधान केले आहे. हायड्रॉक्सी क्लोरोक्वीनची कमतरता निर्माण होऊ नये, यासाठी आरोग्य मंत्रालयाने या औषधाला अत्यावश्यक औषध म्हणून जाहीर केले आहे. या औषधाच्या विक्रीवर आणि वितरणावर निर्बंध आणले आहेत.

डॉक्टरचा मृत्यू
मेलरियावर प्रभावी ठरणारे हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन हे औषध घेतल्याने एका खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आसामच्या गुवहाटी शहरात शनिवारी ही घटना घडली. सध्या करोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचारासाठी हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन या औषधा वापर करण्यात येत आहे.

आपल्याला करोना व्हायरसची लागण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून डॉक्टरने स्वत:च हे औषध घेतले अशी माहिती सूत्रांनी दिली. या औषधामुळेच त्याला ह्दयविकाराचा झटका आला का? हे स्पष्ट झालेले नाही. पण व्हॉट्सअ‍ॅपवरुन आपल्याला सहकाऱ्याला पाठवलेल्या मेसेजमध्ये औषध घेतल्यानंतर अस्वस्थतता वाटत असल्याचे त्याने म्हटले होते.