22 April 2019

News Flash

मी रवी पुजारी नाही अँथनी फर्नांडिस, हस्तांतरणाला लागणार विलंब

सेनेगलमध्ये अटक करण्यात आलेला कुख्यात गँगस्टर रवी पुजारीच्या हस्तांतरणाला विलंब लागू शकतो. रवी पुजारीने आपली ओळख नाकारली आहे.

सेनेगलमध्ये अटक करण्यात आलेला कुख्यात गँगस्टर रवी पुजारीच्या हस्तांतरणाला विलंब लागू शकतो. रवी पुजारीने आपली ओळख नाकारली असून सेनेलग सरकारकडे त्याने त्यासंदर्भात अर्ज केला आहे. पुजारीच्या वकिलांनी सेनेगलच्या अधिकाऱ्यांकडे त्याचा पासपोर्ट जमा केला असून त्याचे नाव अँथनी फर्नांडिस असल्याचा दावा केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

रवी पुजारीला भारतात आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय सेनेगलमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहे. त्यांनी रवी पुजारी गँगच्या कारवाया आणि त्याच्या विरोधातील पुराव्यांची फाईल सेनेगलच्या तपास यंत्रणेकडे सुपूर्द केली आहे. मुंबई आणि कर्नाटक पोलिसांच्या विनंतीवरुन इंटरपोलने त्याच्या विरोधात १३ रेड कॉर्नर नोटीस जारी केल्या होत्या.

पुजारीची ओळख पटवण्यासाठी आणखी कागदोपत्री पुरावे गोळा करण्यासाठी भारतीय दूतावासाने वेळ मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई आणि कर्नाटक पोलिसांना रवी पुजारीच्या कुटुंबियांचे डीएनए नमुने घेऊन ते तात्काळ सेनेगलला पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. रवी पुजारीच्या दोन बहिणी जयालक्ष्मी सालियन आणि नैना पुजारी या दिल्लीमध्ये रहातात. त्यांचे डीएनए नमुने घेतले जाऊ शकतात.

पुजारीची पत्नी पद्मा आणि त्याच्या तीन मुलांकडे बुरकीना फासोचे पासपोर्ट आहेत. दोन आठवडयांपूर्वी पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल येथून रवी पुजारीला अटक करण्यात आली. रवी पुजारीने अनेक अंडरवर्ल्ड डॉनसोबत काम केलं आहे. दोन दशकांपूर्वी त्याने स्वत:चा वेगळा गट तयार केला होता. त्याच्यावर अनेक देशांमध्ये खंडणी तसंच हत्येचे गुन्हे दाखल आहेत.

First Published on February 11, 2019 12:08 pm

Web Title: i am anthony fernandes not ravi pujari