माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे दीर्घ आजाराने एम्स रूग्णालयात निधन झाले. त्यानंतर त्यांचे सर्वात जवळचे मित्र, सहकारी आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अटलजी माझ्यासाठी एक वरिष्ठ सहकारी होते, मात्र ६५ वर्षांपेक्षा जास्त काळ ते माझे मित्र होते. आज त्यांच्या निधनाची बातमी आली माझ्याकडे दुःख व्यक्त करण्यासाठी शब्दच नाहीत. भारताच्या सर्वात महान नेत्यांमध्ये ज्यांचे नाव घेतले जाते अशा नेत्याला आपण आज मुकलो आहोत असे आडवाणी यांनी म्हटले आहे.

आज माझ्या मनात अटल बिहारी वाजपेयी यांच्या अनेक आठवणी आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक प्रचारक म्हणून आम्ही काम केले. भारतीय जनसंघाची स्थापना, आणीबाणीच्या वेळचा संघर्ष, भाजपाची स्थापना या सगळ्या प्रवासात आम्ही एकत्र होतो. अटल बिहारी वाजपेयी यांची पंतप्रधान पदाची कारकीर्द देश कायम स्मरणात ठेवेल. त्यांच्या काळात मी उपपंतप्रधान होतो. माझे वरिष्ठ म्हणून त्यांनी मला कायम प्रोत्साहित केले.

वाजपेयी यांची भाषण देण्याची हातोटी, नेतृत्त्व गुण, देशभक्ती, भारतमातेबद्दल असलेला अभिमान, माणसातले माणूसपण ओळखण्याचा गुण, अंगी असलेली नम्रता आणि मतभेद असूनही विरोधकांना आपलेसे करून घेण्याची क्षमता या सगळ्याचा माझ्यावर प्रभाव पडला. अटल बिहारी वाजपेयी यांना मी कधीही विसरू शकत नाही असेही लालकृष्ण आडवाणी यांनी स्पष्ट केले.