तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांची जागा भरून काढण्यासाठीच मी राजकारणात प्रवेश केला आहे असे सुपरस्टार रजनीकांत यांनी म्हटले आहे. सोमवारी त्यांनी तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. डॉक्टर एमजीआर एज्युकेशनल अँड रिसर्च इन्स्टिट्युटमध्ये हा सोहळा पार पडला त्याचवेळी त्यांनी ही भूमिका मांडली. ३१ डिसेंबर २०१७ ला मी राजकारणात येणार आणि पुढील विधानसभा निवडणुका लढवणार अशी घोषणा रजनीकांत यांनी केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच जयललिता यांची जागा भरून काढण्यासाठी राजकारणात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये सहभाग घ्यायचा की नाही याचा निर्णयही मी घेईन असेही रजनीकांत यांनी म्हटले आहे.

अनेकदा राजकारणी असे म्हणतात की हल्ली राजकारणात अभिनेते किंवा कलाकार का येत आहेत? त्यांचा मेकअप उतरवून त्यांना राजकारणात येण्याची गरजच काय? त्यांना हेच उत्तर देईन, मी आता ६७ वर्षांचा आहे. अजूनही तुम्ही तुमचे काम नीट करत नाही. मग मला राजकारणात यावेच लागणार, म्हणूनच मी राजकारणात येतो आहे.

यावेळी झालेल्या भाषणात रजनीकांत म्हटले, महाविद्यालयीन आयुष्य हे म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील सोनेरी दिवसांप्रमाणे असते. मात्र हे दिवस सर्वात महत्त्वाचेही असतात हे विसरून चालणार नाही. राजकारणाबाबत काय घडते आहे. राज्याचे, देशाचे राजकारण कोणत्या दिशेने जाते आहे हे जरूर वाचा. त्याची माहिती ठेवा पण महाविद्यालयात असताना राजकारणात पडू नका. मी राजकीय पक्ष काढला तर त्यात तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना घेणार नाही. तुम्ही तुमच्या अभ्यासावर आणि ध्येयावर लक्ष केंद्रीत करा. इंग्रजी शिकण्यावर भर द्या. मी माध्यमिक शिक्षण कन्नड माध्यमातून घेतले. त्यावेळी मी हुशार होतो. पण मी इंग्रजी माध्यमात प्रवेश घेतला तेव्हा मला ती भाषा सुरुवातीला जड गेली. सध्या सगळेच कोर्सेस इंग्रजी भाषेत आहेत. त्यामुळे त्या भाषेचे महत्त्व विसरून चालणार नाही ती भाषा प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे असेही रजनीकांत यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

आपल्या भाषणात रजनीकांत यांनी माजी मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन अर्थात एमजीआर यांच्याही आठवणींना उजाळा दिला. मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे त्याची अनेक कारणे आहेत पण त्या अनेक कारणांपैकी एक कारण एमजीआर सरही आहेत. मला त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सिनेमाचे शुटींग करताना अभिनेत्याने काळजी घेतली पाहिजे . अभिनेत्याने स्वतःची तब्बेत सांभाळली पाहिजे असे मला ते कायम सांगत. त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आलो याचा आनंद होत असल्याचेही रजनीकांत यांनी म्हटले.