शीखविरोधी दंगलीचा ठपका ठेवत दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा भारतरत्न पुरस्कार परत घेण्यात यावा असा प्रस्ताव दिल्ली विधानसभेत मंजूर झाला. मात्र या प्रस्ताववर आपमध्येच एकमत नसल्याचे दिसून आले. कारण आपच्या आमदार अलका लांबा यांनी सोशल मीडियावर व्यक्त होत या प्रस्तावासंदर्भात नाराजी व्यक्त केली. यानंतर अलका लांबा राजीनामा देणार का? अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही असे म्हणत अलका लांबा यांनी म्हटले आहे.
Aam Aadmi Party MLA Alka Lamba: I am not resigning. (File pic) pic.twitter.com/dXmvnSkEpp
— ANI (@ANI) December 22, 2018
देशात १९८४ मध्ये शीखविरोधी दंगल उसळली होती, तो नरसंहार होता, त्यामुळे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांना देण्यात आलेला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी किताब परत घेण्यात यावा, असा ठराव शुक्रवारी दिल्ली विधानसभेत मंजूर करण्यात आला. आपचे आमदार जर्नेलसिंग यांनी हा ठराव मांडला, तो सभागृहात आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.
त्याचवेळी चांदनी चौकमधून निवडून आलेल्या आपच्या आमदार अलका लांबा यांनी या ठरावाला विरोध दर्शवला. ठरावादरम्यान त्यांनी सभात्याग केला. सभागृहाबाहेर माध्यमांच्या प्रतिनिधींना त्यांनी प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी या ठरावाचा उघडपणे विरोध केला. यानंतर पक्षनेतृत्वाने अलका लांबा यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतली.’पक्षाने माझ्याकडे आमदारकीचा राजीनामा मागितला असून त्यांनी मला पक्षाच्या प्राथमिक सदस्यात्वाचाही राजीनामा द्यायला सांगितला आहे’, असे लांबा यांनी सांगितले, मात्र काहीही झाले तरीही राजीनामा देणार नाही असे आता त्यांनी स्पष्ट केले आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.