भारतातील बँकांचे हजारो कोटी रुपये थकवून परदेशात पळालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याने आता सीबीआय (CBI)  आणि सत्ताधारी भाजपवर (BJP) टीका केली आहे. यूपीए आणि एनडीएमधील सामन्यात माझा फुटबॉल झाल्याचा आरोप विजय मल्ल्याने केला असून सीबीआयच्या तपासावरही मल्ल्याने प्रश्न उपस्थित केले आहेत.

मल्ल्याला नऊ हजार कोटी रुपयांच्या कर्जाची खिरापत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांच्या दबावानेच वाटल्याचा गंभीर आरोप भाजपने सोमवारी केला होता. त्यासंदर्भातील पत्रव्यवहार आणि गोपनीय कागदपत्रे पक्षाने उघड केली होती. या पार्श्वभूमीवर विजय मल्ल्याने ट्विटवरुन सीबीआय आणि सत्ताधा-यांवर निशाणा साधला.

प्रसारमाध्यमांचा वापर आता खेळपट्टी म्हणून होत असून मी फुटबॉल आहे. या सामन्यात एनडीए आणि यूपीए हे दोन संघ असून दुर्दैवाने सामन्यामध्ये पंच नाही असे मल्ल्याने म्हटले आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांमुळे मला धक्काच बसलाय. ते सर्व आरोप निराधार आणि चुकीच्या गृहितकांवर आधारलेले आहेत. पोलीस दलातील काही वरिष्ठांना व्यवसाय आणि अर्थव्यवस्था याबद्दल काय माहिती असणार, असा प्रश्न मल्ल्याने उपस्थित केला.  सीबीआय ठराविक ईमेल प्रसारमाध्यमांना देत असून या मेलचा चूकीचा अर्थ काढून माझ्याविरोधात आणि तत्कालीन यूपीए सरकारविरोधात आरोप केले जात आहेत असा दावाही मल्ल्याने केला आहे.

‘किंगफिशर’ या मल्ल्यांच्या बुडालेल्या विमान कंपनीला नियमबाह्य़ कर्जे दिल्याप्रकरणी आयडीबीआय बँकेचे माजी प्रमुख योगेश आगरवाल यांना अटक केल्यानंतर मल्ल्याचे पाप ‘यूपीए’ सरकारचे असल्याचे दाखविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. २००४ ते २०१३दरम्यान त्यांच्या कंपन्यांची कर्जे थकलेली असताना आणि मूल्यांकन नसतानाही मल्ल्याना अतिवेगात आणि नियमबाह्य़ पद्धतीने कर्जे वाटली गेल्याचे दाखविणारी ही कागदपत्रे असून त्यात प्रामुख्याने मल्यांनी मनमोहन सिंग व चिदम्बरम यांना लिहिलेल्या पत्रांचा समावेश होता.