वयाच्या 96 व्या वर्षी ‘अक्षरलक्षम’ साक्षरता मोहिमेच्या परीक्षेत 100 पैकी 98 गुण मिळवल्याने चर्चेत आलेल्या कार्तियानी अम्मा यांचा गुरुवारी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्तियानी अम्माकेरळच्या अलप्पुझा जिल्हय़ाच्या रहिवासी आहेत. परीक्षेत सहभागी होणाऱ्या त्या सर्वात वयोवृद्ध परीक्षार्थी होत्या.

‘अक्षरलक्षम’ साक्षरता मोहिम केरळ सरकारकडून राबवण्यात येत असून यामध्ये लेखन, पाठांतर आणि गणिताचे कौशल्य तपासले जाते. परीक्षेत सुमारे 43 हजार 330 जणांनी सहभाग नोंदवला होता. यामधील 42 हजार 933 जण उत्तीर्ण झाले.

चेहऱ्यावर एका लहान मुलाप्रमाणे हास्य आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व असणाऱ्या कार्तियानी अम्मा यांना परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यासोबतच परीक्षेत अव्वल येणाऱ्या सर्वात वयस्कर व्यक्ती ठरण्याचा रेकॉर्ड त्यांनी केला आहे.

आपल्या यशाचं गुपित सांगताना अम्मा यांनी आपण कोणतीही कॉपी केली नाही, पण इतरांना आपला पेपर पाहून कॉपी करायला दिलं असल्याचं सांगितलं. हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य कायम होते.

साक्षरता मिशनच्या परीक्षेत ९६ वर्षीय महिलेने मिळवले ९८ टक्के गुण

‘मी कोणाचंही पाहून कॉपी केली नाही. पण इतरांना आपला पेपर पाहून कॉपी करुन देत होते. मी त्यांना काय लिहिलं पाहिजे सांगितलं. मी गेल्या दोन महिन्यांपासून अभ्यास करत होते. अनेकजण मला शिकवण्यासाठी पुढे आले होते, ज्यामुळे मला सगळं सोप्पं गेलं. मी गणित, नंबर आणि अक्षरं शिकले’, असं अम्मा सांगतात.

इतर मुलांना अभ्यास करताना पाहून आपल्याला परीक्षा देण्याची इच्छा निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आपल्याला सरकारी अधिकारी होण्याची इच्छा होती असंही त्या सांगतात. ‘इतर मुलांना अभ्यास करताना पाहून मला परिक्षा देण्याची प्रेरणा मिळाली. तरुण असताना मला संधी मिळाली नाही अन्यथा सरकारी अधिकारी झाले असते’, असं अम्मा यांनी सांगितलं आहे.