माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाची बातमी अत्यंत क्लेशदायक आहे, अशी प्रतिक्रिया माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिली आहे. अटलजींनी देशाला आपले आयुष्य अर्पण केले होते, एक महान राजकारणी, अद्वितिय लोकसेवक, प्रभावी कवी, शानदार वक्ता, उत्कृष्ट खासदार आणि महान माणूस देशाने गमावला आहे. आधुनिक भारतातल्या प्रमुख नेत्यांपैकी अटल बिहारी वाजपेयी एक होते. या देशाला त्यांची कमतरता कायम भासेल असेही मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे. मी त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकलो त्यांच्या जाण्याने देशाने एक महान नेता गमावला आहे असेही सिंग यांनी स्पष्ट केले. ट्विटरवरून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे आज एम्स रूग्णालयात निधन झाले. साहित्यिक, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी ओळख अनेकांगी ओळख असलेले अटल बिहारी वाजपेयी हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचार सुरू होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह देशातल्या अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या भावना ट्विटरवर व्यक्त केल्या आहे. ते ९३ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी संध्याकाळी ५.५ मिनिटांनी त्यांचं निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले आहे.