पाकिस्तान फुल झाल्यानेच आता भाजपाचे नेते विरोधकांना चंद्रावर पाठवत आहेत अशी टीका चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांनी केली आहे. अदूर गोपालकृष्णन यांनी जय श्रीरामच्या नावे घोषणा देणाऱ्यांवर टीका केली आहे. धर्माच्या नावे हिंसा मान्य नाही असे त्यांनी म्हटले आहे.

‘पत्राच्या माध्यमातून मी जो आवाज उठवला आहे तो सरकारविरोधात किंवा जय श्रीरामच्या घोषणा देणाऱ्यांविरोधात नाही. हा आवाज त्या घटनांविरोधात आहे जिथे मारहाणीत एखाद्या व्यक्तीची हत्या केली जाते. या घटनांदरम्यान या जयघोषांचा वापर युद्धाच्या घोषणांसारखा केला जातो त्याविरोधात मी आवाज उठवला आहे,’ असं अदूर यांनी स्पष्ट केलं आहे.

मात्र अदूर गोपालकृष्णन यांच्या टीकेनंतर भाजपा नेते बी गोपाळकृष्णन यांनी त्यांना चंद्रावर जाण्याचा सल्ला दिला आहे. ज्यावर प्रत्युत्तर देताना पाकिस्तान फुल झाल्यानेच भाजपा नेते विरोधकांना चंद्रावर जाण्याचा सल्ला देत आहेत असे त्यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर जे मला चंद्रावर जाण्याचा सल्ला देत आहेत त्यांनी मला चंद्रावर जाण्यासाठी तिकिट बुक करुन द्यावे आणि चंद्रावर एक रुम बुक करुन द्यावी मी चंद्रावर जायला तयार आहे. तिथे राहण्यास मला आनंदच वाटेल असंही अदूर गोपालकृष्णन यांनी उपरोधिकपणे म्हटलं आहे.

मुख्यमंत्री पी विजयन आणि मल्याळम सिनेसृष्टीतील अनेकांनी अदूर गोपालकृष्णन यांच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच भाजपा प्रवक्त्यांनी केलेली टीका चुकीची असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.