हरयाणातील पंचकुलामध्ये बाबा राम रहिम यांना लैंगिक शोषण आणि बलात्कार प्रकरणी दोषी ठरविल्यानंतर मोठा हिंसाचार उसळला. या सगळ्या हिंसाचारात डेरा सच्चाच्या एकूण ३७ अनुयायांचा जीव गेला, तर २५० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.

याप्रकरणी स्वंयघोषित संत राधा माँ यांना ‘इंडिया टुडे’ने काही प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांना उत्तरे देताना राधे माँ यांनी तर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही संतच मानते असे उत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जो काही निर्णय घेतील तो योग्यच असेल असेही राधे माँ यांनी म्हटले आहे. डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम यांच्याबाबतही त्यांनी केलेले वक्तव्य सूचक आहे. ज्यांची घरे काचेची असतात त्यांच्या घरांवर दगड फेकले जातातच. असे राधे माँ यांनी म्हटले आहे.

काय आहेत राधे माँ यांना विचारण्यात आलेले प्रश्न?
प्रश्न-बाबा राम रहिम यांना बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरविले गेले आहे, तुमचे काय म्हणणे आहे?
उत्तर-मी सगळ्या धर्मगुरूंचा आदर करते, मला या विषयावर काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही
प्रश्न-धर्मगुरूंचा आदर करता हे ठीक आहे मात्र बाबा राम रहिम यांची रवानगी आता तुरूंगात करण्यात आली आहे
उत्तर-ज्यांचे घर काचेचे असते त्यांच्या घरावर दगड फेकले जातातच, बाबा राम रहिम यांच्याबाबत मी काहीही भाष्य करणार नाही.

प्रश्न-बाबा राम रहिम यांना दोषी ठरविण्यात आल्यानंतर हरयाणासह चार राज्यांमध्ये हिंसाचार उसळला त्याबाबत तुम्हाला काय वाटतं?
उत्तर– मला यावर काहीही भाष्य करायचे नाही. माझे शंकरावर प्रेम आहे, मला माझे घर वाचवायचे आहे
प्रश्न– बाबा राम रहिम यांच्या अनुयायांना काही सल्ला द्याल का?
उत्तर– मला कोणालाही काहीही सल्ला द्यायचा नाही

प्रश्न– देशातील बाबा आणि संत यांच्यावर कारवाई होताना दिसते आहे एका पाठोपाठ एक बाबा तुरूंगात जाताना दिसत आहेत
उत्तर– भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे, ते खूप समजुतदार आहेत मी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही संतच मानते. ते जो काही निर्णय घेतील तो एकदम योग्यच असेल याची मला खात्री आहे.

एकंदरीतच काय तर राधे माँ यांनी बाबा राम रहिम यांच्या शिक्षेबाबत आणि पंचकुलामध्ये उसळलेल्या हिंसाचाराबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संतपद बहाल केले आहे. आता यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काही उत्तर दिले जाते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.