समाजवादी पक्षाचे नेते आणि नऊ निवडणुकांमध्ये रामपूरचे आमदार म्हणून निवडूण आलेले आझम खान पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. याच पार्श्वभूमीवर एका मुलाखतीमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिका केली आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये खान यांनी ‘मोदी सरकारने पुलवामा हल्ल्याला उशिरा उत्तर दिले,’ असं मत नोंदवले आहे.

पाकिस्तानवर हवाई हल्ला केल्यानंतर भाजपा पुन्हा निवडूण येण्याची शक्यता वाढली आहे असं तुम्हाला वाटतं का?, या प्रश्नाला उत्तर देताना खान यांनी मोदी सरकारने पाकिस्तानला उशिरा उत्तर दिल्याचे म्हटले. ‘पाकिस्तानवर झालेल्या हवाई हल्ल्याबद्दल मी आपल्या सरकार कोणताही प्रश्न विचारु इच्छित नाही. मात्र भाजपाने केलेल्या दाव्यानुसार बालाकोटमध्ये ३०० हून अधिक लोक मारले गेले. असे असेल तर पाकिस्तानने त्यांच्यावर अंत्यसंस्कार का केले नाहीत?, असा सवाल मला पाकिस्तानला करायचा आहे. तसेच आपल्या सरकारने पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला उत्तर देण्यास उशीर केला. मी पंतप्रधान असतो तर मी ४० सेकंदांच्या आतमध्ये पाकिस्तानला या हल्ल्याचे उत्तर दिले असते,’ असा दावा आझम खान यांनी केला.

लोकांचा भाजपावरील विश्वास उडला असल्याने भाजपामधून माझ्याविरोधात कोणीही लढले तरी मला विशेष फरक पडणार नाही असा विश्वास खान यांनी व्यक्त केला आहे. ‘निवडणूक लढणे कायमच आव्हानात्मक असते. मात्र पक्षाने जिल्ह्यामधील मतदारांना लक्षात घेत मला संधी दिली आहे. त्यामुळे भाजपामधून कोणताही उमेदवार असला तरी लोकांचा भाजपावरील विश्वास उडाला असल्याने त्याचा विशेष फरक पडणार नाही’, असं खान म्हणाले.

तसेच समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंग यादव यांची, ‘मोदींनेच पंतप्रधान व्हावे’ ही इच्छा आपल्याला योग्य वाटत नसल्याचेही खान यांनी सांगितले. ‘प्रचारासाठी मी मुलायम सिंग यांना बोलवणार की नाही अद्याप ठरलेले नाही, मात्र बऱ्याच दिवसांपासून माझी आणि त्यांची भेट झाली नाही. आमच्यात मतभेद नाहीत तरी पंतप्रधान म्हणून मोदीच हवेत ही नेताजींनी (मुलायम सिंग) व्यक्त केलेली इच्छा मला पटलेली नाही,’ असं स्पष्ट मत खान यांनी व्यक्त केले. क्राँग्रेसने उमेदवार उभा केल्याने मुस्लिम मतांचे विभाजन होणार नाही असा विश्वास खान यांनी व्यक्त केला. तसेच भाजपाबद्दल जनतेमधील असंतोष पाहता सपा-बसपा-रजद युतीला राज्यात ६५ ते ७० जगांवर विजय मिळेल असंही खान यांनी सांगितले.