देशाला पुन्हा मतपत्रिकांच्या युगात नेणार नाही, असे ठामपणे सांगत आगामी निवडणुका या मतदान यंत्रे आणि व्हीव्हीपॅटच्या माध्यमांतूनच घेतल्या जातील असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी स्पष्ट केले आहे.


अरोरा म्हणाले, आपण ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट वापरणे सुरुच ठेवणार आहोत. यासाठी राजकीय पक्षांकडून आणि उमेदवारांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत. त्याचवेळी मतदानासाठी मतपत्रिकांचा वापर करण्याचा आग्रह धरणाऱ्या मागण्यांमुळे घाबरणार नाही.

नुकतेच लंडनमध्ये पार पडलेल्या हॅकेथॉन दरम्यान सैयद शुजा या एका कथीत सायबर तज्ज्ञाने दावा केला होता की, तो भारतातील मतदान यंत्राच्या डिझाईन तयार करणाऱ्या टीममधील सदस्य होते. तसेच भारतात वापरात असलेल्या ईव्हीएममध्ये फेरफार करता येऊ शकतो, असा दावाही त्यांनी केला होता.

तसेच २०१४ मधील लोकसभा निवडणुकीतही अशा प्रकारे घोटाळा झाल्याचा दावाही त्यांनी केला होता. या दाव्यामुळे खळबळ उडाल्याने निवडणूक आयोगाने दिल्ली पोलिसांना पत्र लिहीत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. याप्रकरणी संसद मार्ग पोलीस ठाण्यात एफआयआरही दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर विरोधकांनी मतपत्रिकेद्वारे मतदानाची मागणी केली आहे.