अरुणाचल प्रदेशमध्ये अपघातग्रस्त झालेल्या एएन 32 विमानातील 13 जणांमधील 6 जणांचे मृतदेह तर 7 जणांच्या मृतदेहांचे काही भाग सापडल्याची माहिती समोर आली आहे. खराब वातावरणामुळे त्यांचा शोध घेण्यास अडथळे येत होते. तसेच अनेकदा शोधमोहिम थांबवण्यातही आली होती.

दरम्यान, शोध पथकात वायुसेना, लष्कराच्या जवानांसह गिर्यारोहकांचा देखील समावेश होता. ३ जून रोजी वायुसेनेच्या एएन-३२ विमानाने जोरहाट येथुन उड्डाण केल्यानंतर अवघ्या 35 मिनिटानंतर विमानाचा संपर्क तुटला होता. या विमानात एकूण १३ जण होते, ज्यामध्ये ८ क्रू मेंबरचा समावेश होता. हे विमान अरूणाचल प्रदेशातील मेचुका येथे जाणार होते. दुर्घटना घडलेले ठिकाण अत्यंत उंचावर व घनदाट जगंलात असल्याने विमानाच्या अवशेषांजवळ पोहचणे आव्हानात्मक होते.

या अपघातात विंग कमांडर जी एम चार्ल्स, स्क्वाड्रन लीडर एच विनोद, फ्लाइट लेफ्टनंट आर थापा, फ्लाइट लेफ्टनंट ए. तंवर, फ्लाइट लेफ्टनंट एस. मोहंती, फ्लाइट लेफ्टनंट एम. के. गर्ग, वॉरंट ऑफिसर केके मिश्रा, सार्जेंट अनूप कुमार, कोरपोरल शेरीन, लीड एअरक्राफ्ट मॅन एस. के. सिंह, लीड एअरक्राफ्ट मॅन पंकज, कर्मचारी पुताली आणि राजेश कुमार यांचा अपघातामधील मृतांमध्ये समावेश असल्याचे भारतीय वायुसेनेकडून सांगण्यात आले होते.

11 जून रोजी हवाई दलाच्या हेलीकॉप्टर एम आय 17 ला ला शोध मोहिमेदरम्यान अरूणाचलच्या सियांगच्या 12 हजार फुट डोंगरावर या विमानाचे अवशेष दिसले होते. त्यानंतर 19 जणांची एक टीम याठिकाणी दाखल झाली होती. परंतु कठिण परिस्थिती आणि खराब हवामानामुळे शोध मोहिमेमध्ये बराच कालावधी लागला होता.