भारतीय वायुसेनेचं लढाऊ मिग-21 विमान कोसळलं आहे. सराव सुरु असताना विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती मिळत आहे. श्रीनगरहून या विमानाने उड्डाण केलं होतं. जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील कलान गावात विमान दुर्घटनाग्रस्त झालं. तांत्रिक बिघाड झाल्याने विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती मिळत आहे. दुर्घटना झालेल्या ठिकाणी दोन मृतदेह सापडले असून यामधील एक मृतदेह सामान्य नागरिकाचा आहे. दुसऱ्या मृतदेहाची ओळख पटवली जात असून वैमानिकाचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्याची दुसऱ्या दिवशी ही दुर्घटना झाली आहे.

दुर्घटना झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. अपघाताचं नेमकं कारण काय होतं याचा शोध घेतला जात आहे. दुर्घटनेनंतर दोन मृतदेह हाती लागले असून यामधील एक मृतदेह सामान्य नागरिकाचा आहे. दुसऱ्या मृतदेहाची ओळख पटवली जात आहे.

दरम्यान भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर आता पाकिस्तानच्या विमानाने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. जम्मू- काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी विमानाने घुसखोरी केल्याचे वृत्त आहे. लेह, जम्मू, श्रीनगर आणि पठाणकोट विमानतळं हाय अलर्टवर असून सुरक्षेच्या कारणास्तव प्रवासी विमानांची वाहतूक थांबवण्यात आली आहे.