वास्तविक नियंत्रण रेखा (एलएसी) बदलू इच्छित असलेल्या चीननं पूर्व लद्दाखमध्ये शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय सशस्त्र दलानं त्वरित केलेल्या कावाईमुळे त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं गेलं. दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह चीनला कठोर शब्दात उत्तर देण्यासाठी हवाई दलानं त्वरित उचललेल्या पावलांचं कौतुक केलं. “हवाई दलानं ज्या तत्परतेनं कारवाई केली त्यामुळे त्यांना योग्य तो संदेश मिळाला आहे,” असं चीनचं नाव न घेता ते म्हणाले. हवाई दलाचे कौतुक करत राजनाथ सिंह यांनी जवानांच्या बालाकोटमधील शौर्याचाही उल्लेखही केला.

भारतीय हवाई दलाच्या कमांडर्सच्या तीन दिवसीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. परिषदेच्या पहिल्या दिवशी राजनाथ सिंह यांनी सर्वांना संबोधित केलं. “देशाच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करणं हे सर्वांचं कर्तव्य आहे. देशातील लोकांना सशस्त्र दलाच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे,” असंही ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी हवाई दलाच्या जवानांनी बालाकोटमध्ये केलेल्या कारवाईबाबतही त्यांचं कौतुक केलं.

राजनाथ सिंह यांनी वास्तविक नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला आणि हवाई दलाला कोणतीही आव्हानं हाताळण्यास तयार राहण्यासही सांगितले. दरम्यान, हवाईदल प्रमुख आरकेएस भदोरिया यांनीदेखील परिषदेला संबोधित केलं. “हवाई दल अल्पकालीन आणि रणनीतिक धोक्याचा सामना करण्यासाठी तयार आहोत. तसंच कोणात्याही शत्रूच्या आक्रमक कारवाईचाही आम्ही सामना करू शकतो,” असं भदोरिया म्हणाले. यादरम्यान संरक्षण मंत्र्यांनी तंत्रज्ञानाच्या बदलांसाठी हवाई दलाच्या भूमिकेचीही स्तुती केली. नॅनो टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर आणि स्पेस सेक्टरसारख्या उदयोन्मुख क्षमतांचा अवलंब करण्याबद्दलही त्यांनी भाष्य केलं.